
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
नसरापूर (भोर) : शालेय जीवन म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कधीच न विसरता येणारा काळ. माणूस कितीही दूर गेला आणि कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरीही बालपण, सवंगडी आणि शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवलेले दिवस आणि गमतीजमती तो कधीच विसरू शकत नाही. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी नसरापूर येथील रामेश्वर माध्यमिक विद्यालयातील २००१ मधील १० वीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
ज्या वर्गखोलीत बसून दहावीचे धडे गिरवले त्याच वर्गात तब्बल २१ वर्षांनंतर पुन्हा हे सर्व विद्यार्थी बसले होते फरक एवढाच होता की, यावेळी ना गणवेश होता न दप्तर. होत्या त्या फक्त त्यावेळेच्या आठवणी.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या पदावर कार्यरत कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी, वकील, इंजिनिअर, पोलीस, नामांकित व्यवसायिक असे एकूण ४३ विद्यार्थी एकत्रित आले होते.गतकालातील आठवणींच्या हिदोंळ्यावर झुलताना प्रत्येकाचे मन दाटून आले होते. यावेळी वर्गातील प्रत्येकाला कठीण प्रसंगी मदत करण्याचा संकल्प करत साऱ्यांनीच धम्माल केली. समाज माध्यमातून हे विखुरलेले विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले होते.
यावेळी काटकर सर, सोनार सर, राऊत सर ,गायकवाड मॅडम या शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे कशा प्रकारे वाटचाल करावी तसेच बदललेली शिक्षण पद्धती, डिजिटल अभ्यास, प्रायव्हेट क्लासेस, मोबाईलचा वापर यामुळे मुलांवर झालेले परिणाम याबाबत माहिती देऊन मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले व एक जबाबदार माजी विद्यार्थी म्हणून शाळेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.