
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड दि. २३ (प्रतिनिधी )
मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन – संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘मायबोली मराठी परिषद’ मुखेडच्या वतीने ‘मायबोली साहित्य संवाद’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २६ मार्च रोजीपार पडणाऱ्या या आगळ्यावेगळ्या साहित्य संवादाचे उद्घाटन कथा – पटकथालेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते होईल तर लोकसाहित्याचे संशोधक डॉ. साहेब खंदारे अध्यक्षपदी असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे व विद्यमान अध्यक्ष प्रकाश पवार हे उपस्थित असतील.हा कार्यक्रम मुखेड येथील सुप्रसिद्ध जिजाऊ ज्ञानमंदिरात पार पडेल.
मागच्या बारा वर्षांपासून मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या मायबोली मराठी परिषदेने ‘मायबोली साहित्य संवाद’चे आयोजन केले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आरंभ सिनेक्षेत्रातील ख्यातनाम कथा – पटकथाकार, कवी,गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते होईल. तसेच लोकसाहित्याचे संशोधक तथा भाष्यकार डॉ. साहेब खंदारे हे अध्यक्ष असतील. सकाळी १० वाजता आरंभ सोहळ्याला सुरुवात होईल. त्यातच ‘गुरुवर्य गौतमजी बोडके शिक्षणसेवा सन्मान’ जि.प.कें.प्रा.शाळेचे शिक्षक तथा ख्यातनाम बासरीवादक ऐनोद्दीन फक्रोद्दीन वारसी यांना तसेच ‘तुळसीराम अक्षरसन्मान’ प्रणीता पोतदार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात ‘कथासंवाद’ होईल. यात सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे व राजाभाऊ कदम यांचे कथाकथन पार पडेल. त्यांच्याशी डॉ. पंडित शिंदे हे संवाद साधतील. तिसऱ्या सत्रातल्या ‘कविसंवादा’त प्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर आणि कवी अमृत तेलंग हे आपल्या कविता सादर करतील. कवींची जडणघडण, निर्मिती प्रक्रिया या संदर्भाने डॉ. केशव खटींग कवींना बोलतं करणार आहेत. शेवटच्या, कलासंवाद’च्या सत्रात सुप्रसिद्ध बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांच्याशी, मायमराठी, या वाहिनीचे संपादक राजेसाहेब कदम व मायबोलीचे संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड हे संवाद साधतील. याच कार्यक्रमात ऐनोद्दीन वारसी त्यांच्या शागीर्दांसोबत वेणूनाद सादर करतील.
मराठीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आगळावेगळा साहित्य संवाद होत असल्याने रसिकांमध्येही एक प्रकारची उत्सुकता आहे.या मायबोलीच्या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्याप्रमाणावर यावं;असं आवतन अध्यक्ष प्रकाश दे. पवार, नामदेव यलकटवार, सचिव साधना पेंढारकर, ज्ञानोबा जोगदंड व प्रसिद्धीप्रमुख सुरेश जमदाडे यांनी दिले आहे.