दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:गुढी पाडव्यानिमित्त राज्य शासनाने दिवाळीप्रमाणेच जीवनावश्यक पाच वस्तू नागरिकांना आनंदाचा शिधा म्हणून वितरित करण्याची भीमगर्जना केली होती. परंतु देगलूर तालुक्यातील नागरिकांना मात्र आनंदाचा शिधा विनाच गुढीपाडवा साजरा करावा लागला. आता आंबेडकर जयंतीपर्यंत तरी अंमलबजावणी होती की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना- भाजप युतीचे सरकार कार्यान्वित झाले. दिवाळीच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतमार्फत जीवनावश्यक पाच वस्तू नागरिकांना अल्पदरात आनंदाची शिधा योजनेअंतर्गत वाटप केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंदाची शिधा ही त्या काळात चांगलीच लोकप्रिय ठरली. हिंदू संस्कृतीनुसार वर्षारंभाचा मुहूर्त साधत गुढीपाडवा ते 14 एप्रिल भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान राज्यभरातील पात्र शिधाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सात दिवसांच्या संपाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी या शिधा प्राप्तच होऊ शकल्या नाहीत. राज्य शासनाने आनंदाची शिधा चार 50% पुरवठा झाल्याचे जाहीर केले असले तरी नांदेड जिल्ह्यात आनंदाचा शिधा देगलूर तालुक्यात कोणत्याही गावांमध्ये पोहोचलेला नाही. गुढीपाडव्याला आनंदाचा शिधापासून देगलूर तालुका वंचित राहिला आहे. आता ही योजना 14 एप्रिलपूर्वी याचा पुरवठा कसा होतो, ही योजना किती जणांपर्यंत पोहचते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
