
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तथा युवक व महिला भगिनींना आपल्या पक्षात प्रवेश करावा यासाठीची साद घातली आहे. राज्यावर वारंवार येणारं अस्मानी संकट परिणामी खस्ता हाल होणारा समुचय शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित असल्याचे नमूद करीत, ती मदत भारत राष्ट्र समिती तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर भरभरुन देतील, असे आवाहन प्रत्यक्ष भेटीतून व पत्रकाद्वारे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी करीत आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील काही शहरं, तालुके व जिल्हा स्थानी भेटी देत बैठकांवरही त्यांचा जोर असल्याचे दिसून येत आहे. त्यांत लोकांना आपली मते पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, केसीआरचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी येणकेण प्रकारे महाराष्ट्राला पोखरत कोणत्याही परिस्थितीत मुसंडी मारायची जणू असाच निश्चय केल्याचे दिसत आहे. केसीआर यांनी टाकलेलं जाळं, पणाला लागू शकेल, का ते भुलभूलैय्या ठरले जाईल, हे समजून येणारच आहे. महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व तरुणांना ते किती प्रमाणात पटलं जाईल, हे येणारा काळच दाखवून देणार आहे. कारण तो शेतकरी राजकीय आजच्या बाजारात वावरणारा नसला, कष्टकरी असून तो कमी शिकलेला असला तरी तो शब्दाला जागणारा आहे. शेतमजूर अशिक्षित असला तरी तो कोणत्याही प्रकारची घाई न करता थंड डोक्याने विचार करणारा नक्कीच असू शकतो. किंबहुना तसाच विचार ३३ टक्के आरक्षण असलेल्या व राजकीय पदांसाठी बरोबरीचा हक्क कायद्यानुसार मिळवणाऱ्या महिलांच्याही बाबतीत केला तर तोही चुकीचा ठरु नये. राहाता राहिला तो प्रश्न, आजच्या तरुणाईचा. आजचा तरुण सुशिक्षित आहे. पदवीधर व पदव्युत्तर आहे. त्यामुळे तो राजकारणात म्हणावा तसा प्रगल्भ नसला तरी दुसऱ्याच्या डोक्याने तर मुळीच चालणारा नाही. त्यांना आपलं मत नेमकं कोणाला देणं संयुक्तिक ठरु शकेल, एवढं तरी नक्कीच कळू शकतं. राजकारणात कोण आपला नि परका, यावर विश्वास ठेवला जात नाही. कारण कधी कधी आपलं म्हणून ज्याला विश्वासाने समजलं जातं, तेही पलटी मारु शकतात, हे आपण बऱ्याचदा अनुभवले आहे. खरोखरच कोण मदत करु शकतो, करु शकतो का नाही, एवढी तरी त्याला निश्चितच जाणीव असू शकते, होऊ शकते. त्यामुळे तरुणाई बद्दल म्हणावी तेवढी चिंता नाहीच नाही. तथापि केसीआरच्या रुपाने निर्माण झालेलं हे नवं राजकीय दालन शेतकरी, कष्टकऱ्यांपेक्षा माजी लोकप्रतिनिधींना व काही तरी करण्याची संधी मिळू शकेल, अशांना मात्र ही राजकीय उपलब्धता असू शकते. आजतागायत त्या माजी लोकप्रतिनिधींनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पक्षात काम केलं आहे, तेथे त्यांनी काय केलं, काय मिळवलं, काय गमावले यापेक्षा तो
यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला-पुरुष मतदार व तरुणाईसाठी काय केलं, यांच्यावर प्रकाश टाकला तर बरंच काही उमजलं जाईल एवढं खरं. त्याशिवाय ज्या राजकीय पक्षांनी व नेतृत्वांनी सर्वकाही दिलं, तरीही ते त्या. पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षाकडे वळले जातात, ते केसीआरच्या पक्षात गेल्यानंतर तरी काही करु शकतील का, याबद्दलची पाल मतदारांच्या मनात नक्कीच चुकचुकल्या शिवाय राहाणारे नाही. विद्यमान पक्षांतील लोकप्रतिनिधींची असलेली घट्ट पकड, नागरी सुविधांचा वाढता डोलारा ध्यानी घेता कार्यकर्त्यांची तूफान गर्दी आणि त्यांच्या सेवा रुपी कार्याचा वारु रोखण्यात कमी पडल्याने की काय म्हणूनच अडगळीत पडलेल्या या नेत्यांना पुन्हा त्या पक्षातून निवडणूकीची संधी मिळेलच, याची कोणतीही शाश्वती केसीआरच्या पक्षात जाऊ इच्छिणाऱ्या किंवा आतापर्यंत गेलेल्यांना नसावी. किंबहुना त्यासाठीच त्या सर्वांना केसीआरचे हे नवं दालन एक आशेचा किरण वाटला जाणे स्वाभाविक आहे. तो पोषकही ठरु शकेल अशी त्यांची इच्छा असू शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव च्या रुपाने निर्माण झालेलं हे नवं राजकीय दालन कदाचित आशेचा किरण ठरु शकेल, असं वाटणारेच तिकडे प्रवेश करु पहात आहेत. भविष्यातही भरपूर जातील, त्यांना शुभेच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नसावी. हक्काच्या राज्यात जे काही करु शकले नाही, त्यांनी शेजारच्या राज्यात व त्यांच्या पक्षात जाऊन तरी काही तरी मनोभावे करावे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी नाही जमलं तर स्वतः साठी तरी केलं तरी भरपूर ठरलं जाईल असंही शेवटी मतदारांना वाटू शकेल. परंतु जाणाऱ्या सर्वांच्या गतकालीन कार्याचा विचार मतदार नक्कीच करतील यात शंका नसावी. असंही त्या नेत्यांना वाटणं स्वाभाविक असावं.
‘नवा पक्ष, नवा गडी, जाणाऱ्यांची उमेद ही वाढणारीच असू शकेल. काही काळ का होईना, निश्चितच जोमाने गाडी’ चालूही शकेल. केसीआरची सत्ता जरी तेलंगणात असली तरी ती जादू महाराष्ट्रात म्हणावी तशी चालेल का नाही, याचीही साशंकता नक्कीच जाणाऱ्यांच्या मनात राहू शकेल. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र जोमाने साजरा केला जातोय. ७५ वर्षांचा कालावधी महाराष्ट्राच्या राजकारणात कोळून प्यायलेल्या व मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या नेत्यांच्या पक्षात हीच मंडळी गेली अनेक वर्षे कार्यरत होती. त्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या नावांवर एकेकाळी नावाजलेले हेच अडगळीतले नेते किती व कसे मालामाल झाले, याचे विस्मरण मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना कदापिही होणार नाही. ज्यांच्या मतांवर हे नेते निवडून गेले, ते मतदार व शेतकरी जेथे होते, तेथेच आहेत परंतु नेत्यांमध्ये व त्यांच्या मालमत्तेत (संपत्तीत) झालेली मोठ्या प्रमाणात वाढ हे न समजण्यात तरी मतदार जनता दूधखुळी नक्कीच असू शकत नाही. मतदार राजा, बळी राजा दिसायला साधा, भोळा असला तरी तो सूज्ञ नक्कीच आहे. कष्टकरी, शेतमजूर, महिला हे सुध्दा आता बऱ्यापैकी सूज्ञ झाले आहेत. राज्यात वर्षानुवर्षे राजकारण खेळणारा नेते व त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत राजकीय पक्ष यांनी आज पर्यंत याच अडगळीतल्या नेत्यांना सांभाळले आहे, गोंजारले आहे. त्याच पक्षाच्या व नेत्यांच्या नावांवर भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करु इच्छिणाऱ्या या नेत्यांनी जी काही माया, पूंजी गोळा केली असेल, ती यापूर्वी निवडून येण्याअगोदर होती का, असा खडा सवाल हीच भोळी भाबडी जनता एक दिवस विचारल्याशिवाय राहू शकणार नाही. आता नसले तरी त्याचा राग निवडणूकीत मतांच्या रुपाने निश्चितपणे दाखवून देईल,असंही काही जाणकार मतदारांतून बोलतांना आढळून आल्यास नवल ते कसले ?
केसीआर तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत राहाण्यासाठी राष्ट्रीय पक्ष म्हणून नव्याने स्थापना केली आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल किंवा मिळालेली मान्यता टिकवायची असेल तर आणि तरच मतांची अमुक एक टक्केवारी (निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक असलेली) प्राप्त करणे गरजेची आहे. तेवढी मते जर मिळाली नाहीत, तर मात्र मान्यता मिळाली असली तरी ती रद्द केली जाऊ शकते. किंबहुना त्याचसाठी केला जाणारा हा अट्टाहास कृतीत आणला जावा म्हणून तेलंगणाबरोबरच महाराष्ट्रातही मुसंडी मारण्याचे व आपले इक्षिप्त साध्य करण्याचे रचलेले मनसुबे कितपत यशस्वी होऊ शकतील, हे येणारा काळच दाखवून देणार आहे एवढे नक्की.
तेलंगणात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला आणि तरुणाईला अमूक अमुक मदत दिली जाते, तमुक एक मदत मिळू शकेल, याचे स्वप्न दाखवत आणाभाका करु पहाणाऱ्या याच नेत्यांनी यापूर्वीच्या सत्ताकाळात महाराष्ट्रातील आपापल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना किती मदत मिळवून दिली ? अशा कोणत्या योजना राबविल्या, ज्यामुळे मतदार संघातील बहुतांश शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर सुखावला गेला. भरभरुन आर्थिक मदत मिळवून दिली, ज्यामुळे शेतकरी कष्टकरी, शेतमजूरांना फाशीपासून मुक्ती मिळाली. मिळाली तर किती लोकांना, किती महिलांना रोजगार, काम मिळवून दिले, किती तरुणांना नोकऱ्या लावल्या, रोजगार उपलब्ध करुन दिले. किती सुशिक्षित, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना उद्योग-धंदे टाकून देण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली. त्यांच्यासाठी कोणतीही धडपड न करता या नेत्यांनी जी मदत केली, ते आपले स्वकीय, परिवारातले घटक तथा नात्या गोत्यातल्यांसाठी मात्र जीवापाड मेहनत करुन त्यांना लक्ष्मीपुत्र बनविण्यात धन्यता मानली. अहोरात्र राब राब राबणाऱ्या कार्यकर्त्यांना जर नोकरी लावली किंवा उद्योग-धंदे करण्यासाठी वाव मिळवून दिला तर ते सुधारले जातील. त्यांची आर्थिक स्थिती बळावू शकेल. घरची परिस्थिती हलाखीची न राहाता सशक्त बनली जाईल. एवढेच नाही तर त्यांचे आर्थिक सबलीकरण वाढीस लागले, वाढविले गेले तर आपले झेंडे कोण लावणार, प्रचार कोण करणार, जय हो, जय हो कोण म्हणणार असा संकुचित विचार करणारे हेच नेते त्याच मतदारांना वाऱ्यावर सोडून अन्यत्र जात आहेत. तेथे पण ते आपले राजकीय हित साधून घेतील एवढं नक्की आणि हो, दुसऱ्या पक्षात पण काम करण्यासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांना पुन्हा तेच आशेचं गाजर दाखवत कार्यकर्ते व मतदारांना काही नाही तर नाही परंतु स्वतःचं उखळ मात्र नक्कीच पांढरं करुन घेतल्याशिवाय कोणताही नेता स्वस्थ बसणार नाही एवढं खरं. जीव तोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उद्याही हेच नेते आपली राजकीय पोळी शेकणार आहेत. शिवाय मिळालेल्या मतांच्या आकडेवारीचा फायदा यांना कितपत होऊ शकेल, हे सांगणे कठीण असले तरी त्यांचा फायदा मात्र केसीआरलाही बऱ्यापैकी होणार आहे. शेवटी कार्यकर्ते आणि मतदार कायम उपेक्षित व आहे तेथेच राहिले जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या पक्ष नेतृत्वाने अडगळीत टाकलेल्या ह्याच नेत्यांना केसीआरचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष आशेचा किरण ठरु शकेल, बलशाली असे राजकीय आश्रयस्थानही ठरु शकेल, त्यांच्या आशा निश्चितच द्विगुणित होऊ शकतील यांत शंकाच नाही. तथापि या सर्व कपोलकल्पित मनसुब्यांचा आपल्या राज्यातील परिस्थितीवर नेमका काय परिणाम होऊ शकेल, याचा महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला व पुरुष मतदार आणि तरुणाईने गांभिर्याने विचार करणे गरजेचे ठरणार आहे.
आगामी २६ मार्चला लोहा या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी लोहा -कंधारचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, कन्नडचे माजी आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई श्री.हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे त्या काळातील बरेचसे पदाधिकारी सुध्दा मोठ्या संख्येने प्रवेश करतील. यापूर्वी नांदेड येथे झालेली पहिलीच सभा मोठ्या प्रमाणात गाजली. अशा सभा आणखी बऱ्याच ठिकाणी भविष्यातही होतील, यात शंकाच नाही. सभेला जमणारी गर्दी मतदानात रुपांतरीत होत नसते, हे महाराष्ट्रातील मातब्बर नेते राज ठाकरे यांच्या सभांवरुन मांडणे शक्य होईल एवढे नक्की.