
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर;हिंगोली एमआयडीसी येथून कोंबडीचे खाद्य २३ मार्च रोजी तेलंगणातील बंडापुरम येथे घेऊन जाण्यासाठी निघालेल्या ट्रकच्या चालकाने यातील सुमारे साडेनऊ लाख रुपयांच्या २१ टन खाद्यपदार्थाची परस्पर विल्हेवाट लावली. ही चोरी केल्याप्रकरणी चालकासह एकूण चार आरोपींना देगलूर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, बलजीतसिंग काश्मीरसिंग बाटा (रा. बडपुरा, नांदेड) यांचा ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यवसाय असून, चालक प्रदीप जाधव (रा. दारूतांडा, ता. मुखेड) हा ट्रकमध्ये (क्र. एपी२६ टीडी ८४४९) हिंगोली एमआयडीसी येथून २३ मार्च रोजी कोंबडीचे ३२ टन खाद्य बंडापुरम मंडळ देवरपल्ली ( तेलंगणा) येथे घेऊन जाण्यासाठी निघाला होता.मात्र यापैकी साडेनऊ लाखांचा २१
टन माल रस्त्यातच परस्पर काढून घेऊन विल्हेवाट लावली. याप्रकरणी देगलूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक रवि मुंडे यांच्यासह सुनील पत्रे, कृष्णा तलवारे, आडवे, घुळे इत्यादींनी तपासाची चक्रे फिरवून चालक आरोपीला अटक करून अधिकची चौकशी केली असता आरोपीने त्याचा मित्र प्रेमदास चव्हाण (रा. दारूतांडा) याला सोबतीला घेत यातील कोंबडी खाद्य साथीदार बलवंत ठाकूर, पृथ्वीराज ठाकूर (रा. नावंदी, ता. नायगाव) यांना विक्री केल्याचे सांगितले, अवध्या २४ तासात आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी चौघांना अटक करून देगलूर न्यायालयात उभे केले असता ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस
उपनिरीक्षक रवि मुंडे हे करीत आहेत.