दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणे : पोटापाण्यासाठी रोज मोलमजूरी करून आपले जीवन जगणारे मजूर व कष्टकरी कामगार हे आपल्या परिस्थितीअभावी स्वत:च्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात परिणामी त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील श्री सदगुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने ॲम्बुलन्सद्वारे दर आठवड्याला विविध मजूरअड्ड्यावरील मजूर व कष्टकरी कामगारांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे .
या आठवड्यात दक्षिण पुण्यातील धनकवडी, दत्तनगर,कात्रज, सुखसागरनगर व वारजे येथील मजूर अड्ड्यांवर सकाळी ८ ते १० या वेळेत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.यामध्ये दररोज शंभरहून अधिक महिला व पुरुषांनी शिबिराचा लाभ घेतला. मजुरांचे आरोग्य सुधारण्यासाठी औषधांसोबतच व्हिटॅमिनच्या गोळ्या व मास्कचे वाटप करण्यात आले. ॲम्बुलन्स मध्ये महिलांची तपासणी करण्यात आली.व मठातील खिचडी प्रसाद सर्वांना वाटण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.अविनाश गंगावणे, डॉ.विनय भोसले, डॉ.संजय जगताप, डॉ.हर्षदा कुलकर्णी, डॉ. वैष्णवी कांबळे, डॉ. नीना गंगावणे, डॉ. रुपाली भोसले, डॉ. स्मिता जोशी, डॉ.उमा नास्नोळीकर, डॉ. आरती चौधरी, डॉ अनुपमा गायकवाड, डॉ नितीन बोरा या डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात मोफत सेवा दिली. यावेळी विश्वस्त मंडळ, मठातील सेवेकरी व कर्मचारी मदतीसाठी सहभागी झाले होते .
