
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
पुणे : भोर तालुक्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या हिरडस मावळ खोऱ्यातील वाठार येथे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान,अक्षय ब्लड बँक आणि ग्रामस्थ मंडळ, वाठार (हि.मा.) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१६) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या असंख्य रुग्णांना रक्ताची नियमितपणे भासत आसलेली गरज लक्षात घेऊन वाठार गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन वाठार गावच्या सरपंच सविता खाटपे यांचे हस्ते करण्यात आले. शिबीर दिवशी उन्हाची तीव्रता अधिक असतानाही केवळ “रक्तदान हेच श्रेष्ठदान” समजून पंचक्रोशीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे शिबिरात सहभागी झाले होते.यावेळी एकुण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक सहभागी रक्तदात्यास स्वराज्यभुमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्य आयोजक असलेल्या स्वराज्यभुमी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक चालु वार्ताशी बोलताना सांगितले कि, प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील वेगवेगळ्या गावात दर सहा महिन्याला एक अश्या पद्धतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे आजवर झालेल्या तीन शिबिरांमध्ये एकूण ५४४ पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले असून त्या माध्यमातून शंभरहून अधिक गरजवंत रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करुन देण्यात प्रतिष्ठानला यश आले आहे.