
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे : आयुष्यातील तब्बल ६० वर्षे साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणारे आचार्य डॉ. माधव पोतदार यांचे रविवारी (दि.१६) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. विशेष म्हणजे निधनाच्या एक दिवस अगोदरच त्यांचा वाढदिवस होता. त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष मानाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.लेखक,अनुवादक व पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित असलेले पराग पोतदार यांचे ते वडील होत.
मुळचे पेण तालुक्यातील रहिवासी असलेले डॉ. माधव पोतदार यांनी पेणमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान केलेच परंतु विशेषतः शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या जवळपास दोन हजार महिलांना पदवीधर करण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.साहित्य क्षेत्रासाठी योगदायासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली होती.डॉ. माधव पोतदार यांनी तब्बल १८३ पुस्तकांचे लेखन केले असून कोरोना काळात एकीकडे जग बंदिस्त अवस्थेत असताना डॉ. माधव पोतदार यांनी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करत तब्बल २२ पुस्तकांचे लेखन केले होते. ते अनेक वर्ष संशोधनात्मक अभ्यासात व्यस्त होते.वयाच्या ८७ व्या नॅचरोपॅथीचा अभ्यास क्रम पूर्ण करून प्रमाणपत्र देखील मिळवले होते.
डॉ. माधव पोतदार यांनी लिहलेल्या अनेक पुस्तकांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद दिला त्यापैकी काही निवडक महत्त्वाची पुस्तके –
मंत्र वंदे मातरम, रामरंगी रंगले मन (रामदास), चौदार तळे;एक मुक्तचिंतन, तेजाची आरती,डॉक्टर आंबेडकरांचे सखेसोबती, सभेत कसे बोलावे?, राष्ट्रभक्तीची ज्वाला (सावरकर) , आचार्य अत्रे विनोद व तत्त्वज्ञान, पहिला राष्ट्रपुरुष जगन्नाथ शंकरशेट, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शाहिरांचे योगदान, डॉ.आंबेडकरांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग, आपली माणसं,अमरशेख व्यक्ती-वाङ्मय, मोठ्यांचे मोठेपण, कसे जगावे कसे रहावे?, देव देवाघरी धावला