
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड–ऊसतोड कामगारांचा अपघात अथवा मयत झाल्याने संबंधित ऊसतोड कुटुंबीयांच्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यवाही करावी. प्रामुख्याने ऊसतोड कामगारांची नोंदणी नसल्याने अडचणी होत असून यासाठी त्यांची नोंदणी प्रक्रिया गतीमान करून ओळखपत्र वाटप केले जावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ज्ञानोबा मोकाटे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे जिल्हा प्रभारी तथा सहायक आयुक्त समाज कल्याण रवींद्र शिंदे , जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ ओंकार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध साखर कारखान्याचे प्रतिनिधी, ऊसतोड मुकादम संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते।.
महामंडळाच्या विविध योजनांचे लाभ ऊसतोड कामगार यांना देण्यासाठी त्यांचे नोंदणी असणे गरजेचे आहे. या दृष्टीने जिल्हा परिषद मार्फत ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
सदर प्रक्रिया गतिमान होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी यावेळी बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या , ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साखर हंगामामध्ये विमा उतरवण्यात येतो, त्याचा लाभ साखर कारखान्यांच्या कडून त्यांच्यापर्यंत दिला जाणे गरजेचे आहे. तसेच महामंडळाच्या योजनेचा लाभ व ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी शिक्षणाच्या दृष्टीने सुरू करण्यात येत असलेल्या वस्तीगृहातून व्यवस्था केली जावी असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी यावेळी ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रक्रिये बाबत सांगितले ते म्हणाले बीड जिल्हा परिषदेच्या वतीने यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ऊसतोड कामगार अथवा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी नोंदणीची प्रक्रिया मोबाईलद्वारे किंवा ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक ऑपरेटर कडे जाऊन करू शकतात . या संगणक प्रणालीचे राज्यस्तरावर सादरीकरण झाले असता. अतिशय सोपी नोंदणीची पद्धत पाहून राज्य शासनाने ही प्रणाली राज्यातील इतर जिल्ह्यात देखील लागू करण्यात सूचना दिली आहे ही जिल्ह्यासाठी अभिनंदनीय बाब आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी सदर संगणकीय प्रणालीचे समन्वयक प्रमोद रोटे यांनी सर्व उपस्थितांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली व तांत्रिक बाबी समजावून देऊन या नोंदणी प्रक्रियेचा जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांना लाभ दिला जावा असे सांगितले.
बैठकीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोकाटे , सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री शिंदे यांनी माहिती दिली. साखर कारखान्यांचे प्रतिनिधींनी ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विमा पद्धतीची माहिती दिली. तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यात जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी तालुका निहाय प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. ऊसतोड मुकादम संघटनेच्या वतीने यासाठी योगदान देताना सर्व ऊसतोड कामगारांपर्यंत मुकादम संघटनांच्या वतीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.