
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जि.प विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
जव्हार: सध्याच्या आधुनिकतेच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेली जंगतोड आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कोरतड येथील विद्यार्थ्यांनी आपली दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर ‘सिडबॉल’ बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.समाजात फारसा परिचित नसलेल्या या सीडबॉलचे महत्व मोठे आहे.पर्यावरणाचे संवर्धन आणि जाणीव जागृती मूल्य रुजविण्यासाठी कोरतड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या मुलांच्या सहभागातून आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या हा उपक्रम हाती घेतला आहे.माती,सेंद्रिय खत अर्थात शेण व विविध प्रकारच्या बियाण्यांचे एकत्रित मिश्रण करून त्यांचे छोटे-छोटे गोळे बनवून उन्हात कडक वाळवून खरीप हंगामाचा पाऊस सुरू होईपर्यंत सुरक्षित ठेवले जातात.
योग्य प्रकारे पाऊस झाल्यानंतर हे गोळे म्हणजेच सीडबॉल ज्या ठिकाणी पेरणी अथवा रोपांची लागवड करायची आहे अशा ठिकाणी ठेऊन ही रोपे लागवड करण्याची एक सोपी पद्धत म्हणून या सीडबॉलकडे बघितले जाते.माती मिश्रित असल्याने पावसाळ्यात सहज सीडबॉल मधील बी उगवते.या सीडबॉलमुळे रोपांच्या लागवडीसाठी खोदण्यात येणारे खड्डे खोदण्याची गरज नसते.या अनोख्या सिडबॉलचे फलित म्हणून विद्यार्थी एक हजार सिडबॉलची निर्मिती करून ते वन विभागाकडे पेरणीसाठी जून महिन्यात देण्यात येणार आहेत.या उपक्रमाला कोरतड जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता सहारे,सहशिक्षक प्रदीप चौधरी व बंडावार यांनी हा उपक्रम हाती घेतला असून ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातून हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाला कोरतड शाळा व्यवस्थापन समितीची सुध्दा मोलाचे सहकार्य लाभत आहे.