
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी -वसंत खडसे
वाशिम : जिल्हयातील रिसोड येथे एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या १२ वर्षीय विद्यार्थिनीवर शैक्षणिक धडे देता~ देता लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीने शाळेत घडलेला प्रसंग आपल्या पालकांना सांगितल्यानंतर गुरु~ शिष्य परंपरेला काळीमा फासणारी घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी आरोपी शिक्षकास गजाआड केले आहे.
प्राप्त माहितीनुसार रिसोड येथील एका शाळेतील शिक्षकाने दि.१८ एप्रिल रोजी वर्गातील १२ वर्षीय विद्यार्थिनीस कवितेचा पाठ म्हणावयास सांगितले, सदर चिमुकलेने कविता म्हणण्यास सुरुवात केली असता; आरोपी शिक्षकाने तिच्या अंगावरून हात फिरवला. असे का करता..? असा अल्पवयीन विद्यार्थिनीने प्रतिप्रश्न केला असता, सदर शिक्षकाने वर्गातून काढता पाय घेतला. या पूर्वीसुद्धा असाच प्रकार घडला असल्यामुळे, १२ वर्षीय चिमुकलीने रडत ~ रडत आपल्या पालकांकडे घडलेला प्रसंग कथन करून, यापुढे शाळेत जाणार नसल्याचा हट्ट धरला. घडलेल्या प्रकाराची पालकांना कुशंका आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व रीतसर तक्रार नोंदविली.
दिलेल्या तक्रारी वरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकूर यांनी अनंत देशमुख नामक शिक्षकावर कलम ३५४ भादंवी, पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करू आरोपी शिक्षकास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय महेंद्र गवई करीत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे जिल्हाभरात संतापाची लाट पसरली असून, वारंवार घडणाऱ्या अशा घृणास्पद घटनांमुळे पालक वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.परिणामी, संस्थाचालक या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधल्या जात आहे.