
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
वाघोली,रांजणगाव सांडस, ता. 20 : उरळगाव (ता. शिरूर) येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे उद्घाटन व उरळगाव फाटा ते सात्रस वस्ती, उरळगाव येथील मुख्य चौक काँक्रिटीकरण या कामाचे भूमिपूजन आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता. १९)करण्यात आले.
उरळगाव फाटा ते सात्रस वस्ती रस्ता करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करणार आहे. तर उरळगाव येथील मुख्य चौक काँक्रिटीकरणासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. आमदार ॲड. पवार म्हणाले, ”चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १९५६ कोटींची प्रशासकीय मान्यता २ महिन्यात मिळणार आहे. शिरूर तालुक्यासाठी वरदान असलेल्या चासकमान धरणाबाबत लक्षवेधी सादर केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९५६ कोटींची प्रशासकीय मान्यता पुढील २ महिन्यात मिळणार असल्याची ग्वाही सभागृहात दिली. त्यामुळे १४४ किमी लांबीच्या कालव्यातून ९३० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणे अपेक्षित आहे. मात्र हे काम पूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम झाल्याने यातून ५६० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येते. सदर अस्तरीकरणामुळे ४४ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येण्यास मदत होईल.”
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाख रुपये ही मर्यादा होती या योजने संदर्भात आमदार ॲड. पवार यांनी व इतर आमदारांनी विधानसभेत आवाज उठवल्याने ती पाच लाख झाली आहे. उरळगावसाठी नऊ कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिल्याने ॲड. पवार यांचा सत्कार केला. या वेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविबापू काळे, सरपंच अशोक चव्हाण, मा. सरपंच रघुनाथ गिरमकर, अध्यक्ष नामदेव गिरमकर, तुकाराम गिरमकर सर, जयवंतराव गिरमकर, पोपटराव गिरमकर, रामदास काळे, यशवंत बांडे, शंकर गोटे, मा. चेअरमन राजेंद्र गिरमकर, मा. सरपंच गजानन जांभळकर, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम गिरमकर, कैलास ओव्हाळ, शेखलाल भाई , निळोबा नवले, मा. उपसरपंच अशोक कोळपे, विजय जांभळकर, संतोष मुथा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकडे यांनी केले.