
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर- शितल पंडोरे
——————————————————
सुंदरवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या सशस्त्र टोळक्याने घरात घुसून मुलीला उचलून नेण्याची धमकी कुटुंबाला देत सोने, रोख रक्कम लुटून नेली. त्याच मध्यरात्री याच टोळीने बजरंगनगरमध्ये दरोडा घातला.१८ एप्रिल रोजी मध्यरात्री तीन वाजता सुंदरवाडीतील संतोष निरगुडे यांच्या घराचे दार तोडून चार ते पाच जणांनी त्यांच्या मुलाच्या गळ्याला शस्त्रे लावली. आरडाओरड ऐकून संतोष, त्यांची पत्नी, मुलगी खोलीतून बाहेर येताच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. इतरांनी धमकावत अंगावरील जवळपास पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन मोबाइल पाण्यात टाकून फरार झाले.
दुसरी घटना केंब्रिज चौकामधील बजरंगनगरमध्ये तुकाराम कोळकर यांच्या घरी घडली. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चार ते पाच शस्त्रधारी आले. काही क्षणात दरवाजा तोडून रॉड, काठ्या दाखवून धमकावत ‘सर्व ऐवज दे, नसता सर्वांना मारून टाकू,’ असे धमकावत त्यांच्या पत्नी, मुलीच्या अंगावरील, कपाटातील असे पाच तोळे सोने, दोन मोबाइल घेऊन पसार झाले.
कलमांमध्ये हात आखडता या दोन्ही घटना शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्यांची दोन वेगळ्या पोलिस ठाण्यांत नोंद झाली. सुंदरवाडीच्या घटनेत चिकलठाणा पोलिसांनी भादंवि ३९४ (जबरी चाेरी) अंतर्गत, तर एमआयडीसी पोलिसांनी भादंवि ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच ते सहा जण शस्त्रे घेऊन परिसरात फिरताना दिसत आहेत तरीही पोलिसांनी कलम लावण्यात हात आखडता का घेतला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.