दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि:अन्वर कादरी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद शहर)पोलिसांकडून अवैध धंदे चालू देण्यासाठी हप्ते वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस दलातील संपूर्ण हप्ते वसुलीची यादीच माध्यमांसमोर जाहीर केली. यामुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.
अंबादास दानवे यांनी यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. दानवे यांनी कोणत्या गोष्टीसाठी कोण किती रुपयांची हप्ते वसुली करतो, एजंटच्या नावासहित यादी जाहीर केली.
कलेक्शनचा आकडाच सांगितला
महिन्याला 60 लाख ते 80 लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. त्यामुळे यावर पोलिसांची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
पोलिस आयुक्तांवर टीकास्त्र
औरंगाबादमध्ये झालेल्या दोन गटातील वादावरून अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ”वाद होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच मी मुख्यमंत्र्यांना पोलिसांबाबत पत्र लिहले होते. त्यात शहरात हिंसाचाराची घटना व्हावी असे पोलीस आयुक्तांना वाटत होते. सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून अशी त्यांची भूमिका असावी अशी आम्हाला शंका आहे. आमची सभा रद्द करावी यासाठी हे सगळे होत का असाही प्रश्न पडतोय?, जेव्हा वादाची घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त तब्बल दोन तास उशिरा आले. त्यामुळे हे शहर त्यांना जळून द्यायचे होते का? अशी शंका आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचो चौकशी व्हावी.”
