दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी- वसंत खडसे
वाशिम : सामाजिक न्याय पर्वाच्या औचीत्यातून सर्व प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांची गरज लक्षात घेऊन, समाज कल्याण विभाग वाशिम, दिव्यांग पुनर्वसन केंद्र वाशिम व महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी पूर्वतपासणी व नाव नोंदणी शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
सदर शिबिरामध्ये जिल्हाभरातून सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यामधे अस्थिव्यंग ३५, मतिमंद १८०, मूकबधिर २०७ आणि अंध २४, अशा विविध प्रकारच्या शेकडो, दिव्यांगांनी शिबिरात नाव नोंदणी केली. शिबिराचे उद्घाटन कार्यालय अधीक्षक कु.के.आर. ईश्वरकर यांच्या हस्ते झाले. दरम्यान, समाज कल्याण निरीक्षक कु. अश्विनी राऊत व दिव्यांग पुनर्वसन केंद्र वाशिम यांच्या वतीने, कवठा येथील आधार निवासी मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. आशा पुंड यांनी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी समाज कल्याण निरीक्षक कु. अश्विनी राऊत यांनी दिव्यांग पुनर्वसन केंद्रांतर्गत दिव्यांगासाठी असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली.तर कार्यालयीन अधिक्षक कु. के.आर. ईश्वरकर यांनी युडीआयडी कार्ड नोंदणी कशी करावी या बाबत मार्गदर्शन करून त्या अंतर्गत मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.
