
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे.
मंठा..उन्हाळ्याची दाहकता वाढताच शीतपेय पिण्याकडे सर्वांचा कल असतो. बरेच लोक लिंबू सरबत पिणे पसंत करतात. त्यामुळे आता प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या लिंबाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. ५० ते ६० रुपये किलो मिळणाऱ्या लिंबाची प्रति किलो किंमत आता १५० रुपयांपेक्षा अधिक झाली असून, बाजारात लिंबू १० रुपयांना दोन ते तीन नग मिळत आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाला ‘व्हिटॅमिन सी’ चा उत्तम स्त्रोत मानले गेले असून, उन्हाळ्यात लिंबू आपल्याला हायड्रेट ठेवतो. पचन संस्थेसाठी लिंबू उपयोगी ठरतो. सध्या उन्हाळा सुरू असल्याने लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुरवठा होतनसल्याने लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. भाववाढ झाल्याने लिंबाच्या खरेदीवर देखील परिणाम झाला असून, बऱ्याच लोकांनी लिंबू खरेदी करणे कमी केले आहे. फक्त मोजकेच लोक लिंबू खरेदी करत आहेत. लिंबासह भेंडी, भोपळा, मिरची आणि पालेभाज्यांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. उन्हळ्यात लिंबाच्या लागवडीत भरपूर पाणी लागते. भरपूर पाणी उपलब्ध झाले, तर फळधारणाही चांगली होते. मात्र, रसवंतीगृह, सरबताची दुकाने यावर मोठ्या प्रमाणात लिंबाचा वापर होत असतो.
उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे तसेच रोजंदारी करणारे सर्वसामान्य नागरिक वाढत्या तापमानापासून बचाव व्हावा, यासाठी लिंबाचे सरबत पितात. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या लिंबू सरबताच्या दरातही सध्या लिंबाचे भाव गगनाला भिडल्यामुळे वाढ झाली आहे. लिंबू सरबत गाड्यांवर १० ते १५ रुपयांत मिळत आहे.