
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.24 वाघोली येथे हरवलेला पाच वर्षांचा मुलगा वाहतूक पोलिसांना सापडला असला तरी घरचा पत्ता, पालकांचा मोबाईल नंबर सांगता येत नसल्याने पोलिसांना पालकांना शोधताना असंख्य अडचणी आल्या. अखेर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून पालकांपर्यंत पोहोचवण्यात पोलिसांना यश आले. मुलाला पत्ता किंवा पालकांचा मोबाईल नंबर पाठ असता तर पालकांपर्यंत पोहोचवण्यास सोपे झाले असते त्यामुळे लहान मुलांकडून घरचा पत्ता, पालकांची संपूर्ण नावे, मोबाईल नंबर पाठ करून घ्या असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.
याबाबत मिळालेला माहिती नुसार, पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार प्रमोद जगताप व महिला अंमलदार आशा वाळके हे वाघोली मधील लोहगाव चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आढळून आला. तो रडत होता.यावेळी त्या मुलाला काही सांगता येत नसल्याने पोलिसांनाही मुलाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. त्यांनी या मुलाबाबत सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल केले आणि ही माहिती त्या मुलाच्या आईला कळल्यानंतर ती लोणीकंद पोलीस वाहतूक विभागात आली. पोलिसांनी त्या मुलाला सुखरूप परत त्याच्या आईच्या स्वाधीन केले, त्यांच्या या कामगिरीचे पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने ट्विट करून कौतुक करण्यात आले आहे.