
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रासाठी शहरात शासकीय, निम्म शासकीय मतदान केंद्र उपलब्ध असताना मतदान केंद्रासाठी खाजगी इमारतीची निवड करण्यात आली असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार करत मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिनांक 27 एप्रिल 2023 गुरुवार रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गंगाखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत आहे.
28 एप्रिल 2023 शुक्रवारी रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रासाठी लोकसभा व विधानसभेसाठी शहरात 20 च्यावर मतदान केंद्र आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या नियमा प्रमाणे मतदान केंद्र हे शासकीय अथवा निम शासकीय इमारतीत असणे आवश्यक असते.
असे असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक अधिकारी संदीप तायडे यांनी मतदान केंद्रासाठी कापसे मंगल कार्यालय या खाजगी इमारतीची मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे. या मतदान केंद्राच्या रोडवर गंगाखेड दहा ते बारा दारू दुकाने व बियरबार आहेत .यामुळे या मतदारकेंद्रावर येणाऱ्या वृद्ध व महिला मतदारांना रस्त्यावर दारू पिऊन थांबलेल्या दारुड्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. केंद्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने या महामार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी लागणारे जेसीबी पाण्याचे टॅंकर व इतर वाहने उभा आहेत .त्यामुळे या रस्त्यावर ट्राफिक जाम होऊन वाहनाच्या रांगा लागत आहेत.
शहरातील बस स्थानक व रेल्वे स्टेशन पासून पाचशे मीटर अंतरावर मतदान केंद्र उपलब्ध असतानाही बस स्थानकापासून दोन किलोमीटरच्या वर असलेल्या खाजगी इमारतीची मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र म्हणून निवड करण्यात आली. शहरात शासकीय इमारत मतदान केंद्रासाठी उपलब्ध असताना शेतकऱ्याच्या पैशातून सात लाख रुपये या मतदान केंद्राची साठी खर्च करण्याचा घाट घातला असल्याचे मत बोबडे यांनी दैनिक चालु वार्ता शी बोलताना मांडले.
शेतकऱ्यांच्या पैशाचा दुरूउपयोग करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांची या प्रकरणी चौकशी करून तात्काळ मतदान केंद्रात बदल करुन शासकीय इमारतीत हलवण्यात यावे. तात्काळ मतदान केंद्र बदलणे शक्य नसल्यास मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी ही गंगाखेड तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलेल्या या निवेदनाची दखल घेऊन ही मागणी पूर्ण केल्यास विजयाची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची धाकधूक काही दिवस वाढणार आहे.