
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.28 पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाघोली तसेच उर्वरित लोहगावसाठी महापालिकेच्या भामा-आसखेड योजनेतून पाणी दिले जाणार आहे. या पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे २८१ कोटींचा खर्च येणार असून याबाबतचा आराखडा तयार झाला असल्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केला असल्याची माहिती जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
भीमा-आसखेड योजनेचे पाणी वाघोली परिसरासाठी मिळावे यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत कटके यांनी असंख्य नागरिकांच्या सह्याचे निवेदन देवून मागणी लावून धरली होती. अखेर कटके यांच्या मागणीला यश आल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
वाघोलीसाठी सध्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी प्रतिदिन १५ एमएलडी पाणी दिले जात आहे. हे पाणी अतिशय कमी असल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागतो. आयुक्त विक्रम कुमार यांनी सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या योजनेतून आता या दोन्ही गावांना प्रतिदिन ५९ एमएलडी पाणी दिले जाणार असल्याने या दोन्ही गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे, याबाबत कटके यांनी समाधान व्यक्त करीत आयुक्त यांचे आभार मानले आहेत.