दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि मंठा-सुरेश ज्ञा दवणे
मंठा तालुक्यात अवकाळी पावसासह विजेचे तांडव सुरूच आहे. गुरुवारी व शुक्रवारीं सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तसेच भर उन्हाळ्यात असा अवकाळी वादळ वारा व गाराच्या पावसामुळे लग्न घरातील घरधन्यामध्येही चिंता वाढली आहे.
तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला . मात्र आता उन्हाळा लागला असून सध्या तालुक्यातील अनेक गावागावांत लग्नसराई सुरु आहे. विशेष म्हणजे खेड्यातील लग्नकार्य जागेअभावी उघड्यावर मंडप टाकून केले जातात. आता भर उन्हाळ्यात असा अवकाळी वादळ वारा सुटत असल्यामुळे व पावसामुळे लग्न घरातील पालकांमध्येही चिंतेत आहेत या अवकाळी पावसात लग्न कसं होईल ? या अवकाळी पावसामुळे वधू- वर दोन्ही पक्षाकडील दोन्हीही मंडळीमध्ये चिंता वाढू लागली आहे. लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून मंडप डेकोरेशन, जेवनाची सोय व इतर सोयी करण्यात येतात. मात्र अवकाळी पावसामुळे व वादळवाऱ्यामुळे विदयुत वाहक तार तुटून विदयुत पुरवठा खंडित होणे मंडप उडून तुटणे, पडदे फाटणे तसेच इतर नुकसान होत असल्याने वधु-वरांच्या कुटूंबासह डेकोरेशन वाल्याना आर्थिक फटका बसत आहे. तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. त्यात रब्बी पिकांचे नुकसान झाल्यामुळे आधीच शेतकरी चिंताग्रस्त असताना आता पुन्हा गुरुवारी तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पुन्हा पाऊस झाला या अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अचानक होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असुन दमा असलेल्या रुग्णाना याचा अधिक त्रास जाणवत आहे.
