
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज– केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पर्यटन विकास होणे गरजेचे असून त्या संबंधी आ. नमिता मुंदडा यांनी एमटीडीसी कडे पत्रव्यवहार करत केलेल्या मागणीची पर्यटन विभागाकडून दखल घेण्यात आली असून यासंबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
बीड, लातूर व धाराशिव या तीन जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार होणे हि गरजेची बाब लक्षात घेऊन आ. नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत महामंडळाने धनेगाव प्रकल्पावर जागतिक दर्जाचे जलपर्यटन होण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना एमटीडीसी चे वरिष्ठ व्यवस्थापक यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना दिल्या आहेत व या आशयाचे पत्र आ नमिता मुंदडा यांना नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.