
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा (खं )येथे वर्षानुवर्ष चालत आलेला पाणीटंचाई प्रश्न आजही कायमच आहे. गावातील नागरिक पाणीटंचाईमुळे पुरते हैराण झाले आहेत.विविध पाणी योजना मंजूर असूनही गावास पाणी मिळत नाही.
मस्सा खं हे गाव जवळपास दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. भौगोलिक दृष्ट्या गावाचा विस्तार मोठा आहे. गावातील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणीटंचाई, बारा महिने गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. स्थानिक प्रशासनाने विविध पाणी योजना राबविल्या परंतु त्या सर्वच कुचकामी निघाल्या. एप्रिल व मे मध्ये येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे .
भारत निर्माण योजना कार्यक्रमांतर्गत कोठाळवाडी तलावातील विहिरीतून गावात पाण्याची सोय केली होती. परंतु सदरील योजना ही वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे.तसेच इनाम पाझर तलावाच्या वरच्या बाजूस असलेल्या जुन्या विहिरीतून गावास पाणीपुरवठा केला जातो. परंतु ती देखील कोरडी पडल्यामुळे गावातील नागरीकांच्या तोडचे पाणी पळाले आहे.
एमआरईजीएस अंतर्गत विहीर मंजूर झाली परंतु सदर विहिरीचे खोदकाम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरी असून सदर विहिरीवरून गावास पाणीच नसल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे गावातील नळाला पाणी येत नाही. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना रोज पायपीट करावे लागते. गावात पिण्याच्या पाण्याचे दोन आर ओ प्लांट आहेत परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते वारंवार बंद असतात. ग्रामपंचायत च्या नियोजन आभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मस्सा (खं) येथील गावात पाणीपुरवठा करणाऱ्या दोन सार्वजनिक विहिरी कोरड्या ठाक पडल्यामुळे चार विहिरी अधिकरण करण्यात याव्यात या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायत ने गट विकास अधिकारी कळंब यांच्याकडे पाठवला आहे, परंतु अद्याप एकही अधिग्रहण झालेली नाही.
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून ग्रामपंचायत ने आपल्या पहिल्याच ग्रामसभेत जल जीवन मिशन अंतर्गत चोराखळी साठवण तलावातून गावास पाणीपुरवठा करण्याबाबत ठराव घेतला होता. व मागणी देखील शासन दरबारी झाली आहे,परंतु यावर आजतागायत कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही. एकंदरीत या सर्व गोष्टीचा मेळ स्थानिक प्रशासनाला बसवता येईल का याकडे गावातील नागरिकाचे लक्ष लागले आहे. गावास पाण्यासाठी विविध योजना राबवून देखील वर्षानुवर्ष पाणी प्रश्न कायमच आहे. गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा अशी चर्चा नागरिकातून होत आहे.
सध्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी यांच्या कडे टँकर ची व विहीर, बोर अधिग्रहणाची मागणी केली आहे. लवकरच उपाययोजना करून घेऊन गावाला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच लवकरात लवकर चोराखळी प्रकल्पांतर्गत कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करत आहोत.
त्रिंबक तुळशीराम कचरे
सरपंच मस्सा (खं)