
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
संभाजीनगरातील शहर वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात धडक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. ट्रीपल सीट, रॉगसाईड आणि विना हेल्मेट वाहनचालक पोलिसांच्या रडारवर असून १ मे पासून २२ मे पर्यंत तब्बल १० हजार ८८७ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही आता वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
👮🏻♂️ वाहतूक पोलिसांनी नागरिकांना राँगसाईड वाहने चालवू नका असे, सांगितल्यानंतर सुद्धा सेव्हनहिल, मोंढा नाका, क्रांतीचौक, जिल्हा कोर्ट, नतुन कॉलनी, खोकडपुरा, सिडको चौक, रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा चौक यासह इतर ठिकाणी राँगसाईड आणि ट्रीपलसिट वाहने चालविली जातात. तसेच शहरात सर्रास विना हेल्मेट दुचाकी चालविण्यात येते. त्यामुळे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
🚦१ मे पासून ते २२ मे पर्यंत राँगसाईड, विना हेल्मेट आणि ट्रीपलसीट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये २२ दिवसात १० हजार ८८७ केसेस करण्यात आल्या. त्यानुसार ८० लाख ५५ हजार रूपयांचा दंड वाहतूक विभागाने आकारला आहे. शहरावासीयांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, राँगसाईड वाहने चालवून नये, ट्रीपलसीट आणि विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रभारी सहायक पोलीस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी केले आहे.