
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम – वसंत खडसे
वाशीम: जिल्ह्यात अनेकांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले असल्याचे चित्र काही तालुक्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे. रिसोड तालुक्यात रेती घाटाच्या प्रक्रिया रखडल्याने एकीकडे रेतीची चोरी वाढली, तर दुसरीकडे तुटवडा निर्माण झाला आहे. चोरट्या मार्गाने मिळणारी रेती अव्वाच्या सव्वा भावात खरेदी करणे गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या ऐपती बाहेर असल्याने घरकुलाच्या भिंती तर बांधल्या, पण छत कसं बांधायचं..? हा यक्षप्रश्न गरीब लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेती अभावी घरकुलांचे रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने स्वस्त दरात रेती उपलब्ध करून द्यावी..! अशी मागणी घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्याकडून होत आहे.
समाजात वावरतांना प्रत्येकाला वाटते, की आपले हक्काचे व पक्के घर असावे. या हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य जमेल तसे काबाडकष्ट करून मायापुंजी जमा करतात. आणि त्यातून आपल्या स्वप्नातले घर साकार करतात. मात्र, समाजात अशी अनेक कुटुंबे असतात की रोजच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी त्यांना दररोज काबाडकष्ट करावे लागतात. जीवन जगण्याची लढाई त्यांना रोजच लढावी लागते. त्यामुळे हक्काचे घर त्यांच्यासाठी एक स्वप्नच असते. परिवारातील सर्वांनी मिळून कितीही कष्ट केले तरीही ते स्वतःच हक्काचं घर साकारू शकत नाहीत. अशा गरीब कुटुंबांना निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध घरकुल योजना सुरू केल्या आहेत. सदर योजनांद्वारे गरीब कुटुंबांना हक्काचे व पक्के घरे बांधून देण्यात येत आहेत.परंतु बांधकाम साहित्याची भरमसाठ वाढलेली महागाई आणि बांधकामासाठी महत्त्वपूर्ण असलेला, मुख्य घटक रेती मिळत नसल्याने घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुख्य पैनगंगा व इतर नदयावरील रेती घाटामध्ये मुबलक रेती साठा उपलब्ध आहे. परंतु अनेक घाटांचे लिलाव करण्यात न आल्याने महसूल प्रशासनाने या घाटामधून रेतीचा उपसा करण्यास प्रतिबंध घातला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू असून, सदर रेती मनमानी भावात विकल्या जात आहे. ६ ते ७ हजार रुपये प्रती ब्रास दराने रेती खरेदी करावी लागत आहे. एवढी महाग रेती गरीब लाभार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्याजोगी नाही. त्यामुळे प्रशासनाने स्वस्त दरात मुबलक रेती उपलब्ध होण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
” मला घरकुल मिळालं, मात्र रेतीअभावी माझ्या घरकुलाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. चोरीची रेती खरेदी करणे परवडत नसल्यामुळे, घेणे शक्य नाही. नियोजित काळात घरकुलाचे बांधकाम करणे अनिवार्य असते. बांधकाम रखडल्यास अनुदान मिळण्यास समस्या निर्माण होते. त्यासाठी प्रशासनाने स्वस्त दरात रेती उपलब्ध करून द्यावी..! जेणेकरून बांधकाम पूर्ण होऊन घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल.
___
बाळु पाटील ( खडसे )
शेलुखडसे ता. रिसोड जि. वाशिम