
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड प्रतिनिधी- केंद्र शासन शेतकरी सन्मान निधी या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयाचा निधी देते.त्याच धर्तीवर आता राज्य शासन नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयाचा निधी देणार आहे. पण,दोन्ही केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हा 2हजार रुपयाचा निधी देतांना,तो शेतकरी 1फेब्रुवारी 2019 पूर्वीचा शेतकरी असावा अशी अट घालण्यात आली आहे.त्यामुळे या 2हजार रुपयाचा लाभ पूर्ण शेतकऱ्यांना मिळत नाही.अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.सरकारने शेतकरी म्हणुन योजनेचा लाभ देत असतांना,तो लाभ सर्वच शेतकऱ्यांना दिला पाहिजे.म्हणुन सन्मान निधी व नमो महासन्मान (2हजार रुपयाचा निधी) योजनेसाठी लावलेल्या अटी रद्द करून,सर्वच शेतकऱ्यांना हा लाभ द्यावा अशी मागणी सरकारकडे तहसील कार्यालयामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे,हे निवेदन नायब तहसीलदार महेश हांडे यांनी स्वीकारले.
अनेक शेतकऱ्यांना सन्मान निधी (2हजार रुपयाचा निधी) योजनेसाठी पात्र असूनही अजून लाभ मिळाला नाही.अनेक शेतकऱ्यांना मिळत असलेला हा लाभ बंद झाला आहे.हे पात्र असलेले शेतकरी आपणाला हा लाभ मिळावा म्हणुन कार्यालयाला सातत्याने चकरा मारत आहेत.तरी अजून त्यांचा प्रश्न सुटला नाही.या पात्र शेतकऱ्यांच्या त्रुटी सोडवून त्यांना हा लाभ मिळवून दिला पाहिजे.या शेतकऱ्यांच्या त्रुटी सोडवण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प/शिबीर घेण्याचे आदेश द्या,अशी मागणी निवेदनात केली आहे.