
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.24 वडगाव शेरी मधील प्रभाग क्र. ३ मध्ये ड्रेनेज लाईन सतत तुंबत असल्याने मैलायुक्त पाणी रस्त्यावर साचत आहे. विमाननगर, सोपानगर, सुनितानगर, धनलक्ष्मी सोसायटी, जगंदबा सोसायटी, साईकृपा सोसायटी, पाचवा मैल, सोमनाथ नगर या भागातील ड्रेनेज लाईन ना दुरुस्ती होण्याचे प्रमाण अधिक आहे.
ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्याने रस्त्यावर मैलापाणी साचत आहे, हेच मैलापाणी घरात शिरत आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि मैलापाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगररोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडे याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. परंतु, अधिकारी फोनही घेत नाहीत. ड्रेनेस सफाईला कर्मचारी लवकर पाठवत नाहीत. पालिकेचे कर्मचारी येऊन वरचेवर साफसफाई करीत असले तरी पुन्हा पंधरा दिवसानंतर ड्रेनेजची समस्या निर्माण होत आहे.
महापालिकेने संपूर्ण ड्रेनेजची साफसफाई करण्याचे काम तातडीने करावे, ड्रेनेजच्या तक्रारी आल्यास तक्रार दूर करण्यात याव्यात, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाकडून ही कामे वेळेत झाली नाही तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका श्वेता गलांडे खोसे यांनी दिला आहे.