दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम -वसंत खडसे
वाशिम : विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या जोपर्यंत शासन मान्य करत नाही. तोपर्यंत मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा, पवित्रा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने घेतला आहे. दिनांक १५ मे पासून सुरू असलेल्या सदर आंदोलनात बळीराजांचा आक्रोश आजमितिस सुरूच आहे. देशभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असलेल्या, या आंदोलनाला रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी भेट दिली असून, वाशिम जिल्ह्यातील तथा संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या सर्व मागण्या आपण स्वतः शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती काँग्रेसचे समाज माध्यम प्रदेश महासचिव श्री राजीव इटोले यांनी दिली आहे.
विदर्भ बळीराजा प्रकल्प कृती संघर्ष समितीने आपल्या आंदोलनातील मागण्याबाबत स्पष्ट केले आहे, की सन २००६ ते २०२३ या कालावधीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अतिशय कवडीमोल भावाने सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करून घेतल्या आहेत. तथापि यावेळी १८९४ चा कायदा अस्तित्वात असताना ६ जून २००६ च्या परिपत्रकाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करून घेतल्या आहेत. परिणामी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग रोखल्या गेला आहे. आणि त्यानंतर २०१३ ला पुनर्वसन कायदा लागू झाला आहे. या कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवून २० ते २२ लाखापर्यंत जमिनीचे दर ठरले आहेत. सदर २०१३ च्या पुनर्वसन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळावी, तसेच प्रकल्पग्रस्तांना आज रोजी शासकीय नोकरीत ५% आरक्षण असून त्यानुसार आजतागायत विदर्भातील एकही प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय नोकरीत घेतला गेला नाही. सदर आरक्षणात वृद्धी करून ते ५% वरून १५% करण्यात यावे. व विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय, निमशासकीय नोकरी देण्यात यावी. अशा विविध न्याय व हक्काच्या मागण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे बेमुदत आंदोलन सुरू असून, त्या अनुषंगाने मुंबईच्या आझाद मैदानावर बळीराजांचा आक्रोश सुरूच आहे.
” मी सर्वप्रथम एक शेतकरी आहे त्यानंतर आमदार..! शेती हाच माझा धर्म आहे व शेतकरी हाच माझा श्वास आहे..!! शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा वारसा मला माझे वडील माजी मंत्री तथा लोकनेते स्व. सुभाषरावजी झनक साहेब यांच्याकडून मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्या माझ्या अंतर्मनाला टोचतात. म्हणूनच, मी केवळ वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे; तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी प्रखरपणे मांडत असतो व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असतो. आणि सदैव करतच राहणार..!

___ अमित झनक
( आमदार,रिसोड_मालेगाव मतदार संघ )


