दै. चालु वार्ता
उपसंपादक पश्चिम महाराष्ट्र, शाम पुणेकर
पुणे २२ जून : बालगंधर्व समस्त कलाकार परिवारा तर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनाचा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे.
२६ जून ते २८ जून असा सलग तीन दिवसांचा उत्सव साजरा होणार आहे.
२६ जून रोजी ज्येष्ठ प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री आशाताई काळे यांना “बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार ” राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात येणार आहे. तसेच २८ जून रोजी ‘स्वागत समारंभ व विविध पुरस्कार वितरण समारंभ’ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि काही आमदार व नगरसेवकांच्या उपस्थित होणार आहे.
या तीन दिवसांत पुण्यातील आणि महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येईल. नांदी नमन नटवरा, गणेश वंदना, क्लासिकल फ्युजन, हास्यरंग, जादूचे प्रयोग,महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडी करामती, कीर्तन, आॅर्केस्ट्रा, भारूड, मंगळागौर, प्रसिद्ध अभिनेत्री सुषमा शिरोमणी आणि प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा महिलांसाठी खास लावणी महोत्सव, चर्चासत्र, सेक्सोफोन वादन, नृत्य व गिते सादरीकरण, लोकनाट्य, तमाशा महोत्सव, आनंदवारी, गंधर्व वारी, शिवचरित्रावर व्याख्यान, आवाज महाराष्ट्राचा, जागरण गोंधळ, परिसंवाद, दि रिल स्टार स्टोरी, संदीप पाटील प्रस्तुत डेस्टिनी द बँन्ड तसेच प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले आणि हास्यजत्रा फेम समिर चौगुले यांची प्रकट मुलाखत. अशा विविध सांस्कृतिक रेलचेल असणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि पुणे मनपाचे प्रशासकीय अधिकारी विजय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली…


