
नवी दिल्ली : सकाळी हे शेअर्स बाजार उघडताच घसरणीवर होते. संध्याकाळी बाजार बंद होताना गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. या समूहातील विविध कंपन्यांचे मिळून एकूण 52,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अमेरिकन बाजार नियामकाने हिंडनबर्ग रिपोर्टच्या आधारे या समूहाला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर सकाळपासूनच या समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड सुरु झाली.बाजारात काल सर्वाधिक पडझड अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये दिसून आली. यानंतर अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स यांचा क्रमांक लागला. शुक्रवारी सेन्सेक्स पण 259.52 अंकांच्या घसरणीसह 62,979.37 अंकावर बंद झाला. निफ्टीत काल 105.75 अंकांची घसरण झाली. तर बाजार 18,665.50 अंकावर बंद झाला.
हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनुसार, अमेरिका रेग्युलेटरने अदानी समूहाला, अमेरिकन गुंतवणूकदारांच्या हितसंबंधात काही प्रश्न विचारले. यासंबंधीची वार्ता शेअर बाजारात येऊन धडकताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण आली. बाजारात या कंपनीचे शेअर्स गडगडले. अमेरिकन बाजार नियामकने अदानी समूहावरील कर्जाचा डोंगर पाहून चिंता व्यक्त केली. तसेच शेअर्सच्या किंमतीशी छेडछाड केल्याच्या आरोपावर या समूहाकडून खुलासा मागितला. नियामकने अदानी समूहाला अमेरिकन गुंतवणूकदारांसमोर इत्यंभूत माहिती देण्याचे बंधन घातले आहे.