
दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा शाम पुणेकर.
पुणे: उन्हाच्या कडाक्याने निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात मान्सून लांबणीवर पडल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. मंडईमध्ये पालेभाज्यांना मागणी अधिक असल्याने कोथिंबिरीचे दर ५० रुपयांवर पोहोचले असून मेथी, कांदापात व शेपूचे दर ४० रुपयांवर गेले आहेत. तर, अन्य पालेभाज्यांचे दर २५ रुपये गड्डीवर गेले आहेत.
काही ठिकाणी तर ६० रुपयांपर्यंत मजल गेली आहे. ह्या महागाई मुळे सर्व सामान्य गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. पालेभाज्यांचे विक्रेते चरण वणवे म्हणाले, अवकाळी पाऊस व उन्हाचा चटका बसल्याने पालेभाज्यांवर डाग पडले आहेत. त्यामुळे, पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाली आहे.
बहुतांश ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यंदा महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. परिणामी, बाजारात आवक घटली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे विभागासह नाशिक व लातूर भागांतून एक ते सव्वा लाख कोंथिबिरीच्या जुड्यांची आवक होत आहे. तर, मेथीच्या ५० हजार जुड्यांची आवक होत आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्या ही उपलब्ध असून त्यांची कमी भावाने विक्री करण्यात येत आहे. तर, दर्जेदार पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहे. मॉन्सून आल्यानंतरही पुढील महिनाभर पालेभाज्यांचे हेच दर कायम राहतील, अशी शक्यता काही पालेभाज्या विक्रेत्यांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.