
प्रतिनिधी मंठा
सुरेश ज्ञा.दवणे
मंठा जून महिना सरत आला,मृग संपला, आद्रा नक्षत्राला सुरुवात तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप पेरणी लांबत आहे. तर जेमतेम पाण्यावर जोपासलेल्या ऊसासह फळबागा व जनावरांच्या चारा- पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील या स्थितीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यंदाचा मृग नक्षत्र कोरडा गेला आहे. या नक्षत्रात खरीप पेरणी झाली तर पिके चांगली येऊन उत्पादन वाढते त्यामुळे मिर्गी पेर होणे आवश्यक असते. कारण या नक्षत्रातील पेरनीला शेतकरी महत्वाची समजतात त्यामुळे शेतकरी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडला की, मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरण्या उरकून घेतात. मात्र, यंदा हे नक्षत्र कोरडे गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात येणार आहे. खरीप हंगामाच्या अडीच-तीन महिन्यात चांगले उत्पन्न देणारे पिके तालुक्यातील शेतकरी काढतात. मात्र, पावसाने दडी मारल्याने उत्पन्नात घट होऊन शेतकर्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकर्यांनी पेरणीयोग्य मशागत बी-बियाणे यासाठी खर्च केला आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर होत आहे. हवामान विभागाने पावसाबाबत व्यक्त केलेला अंदाज साफ चुकला आहे.त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप पेरणीची तयारी केली होती. मात्र पाऊस लांबत गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जेमतेम पाण्यावर जोपासलेले ऊस फळबागा सुकत आहे तर शाळू ज्वारी पेऱ्यात घट झाल्याने वैरण (कडबा )मिळणे कठीण झाल्याने व पाऊस लांबल्यामुळे पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. लवकर पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे.