
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक मोहन आखाडे छत्रपती संभाजीनगर
देशाला पहिल्यांदाच गरिबांचा पंतप्रधान मिळाला, पुन्हा २०२४ लाही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. भाजपला जातिवादी म्हणणारे मोदींविरोधात पाटणामध्ये एकत्र आले. ते आमच्या बरोबर होते तेव्हा आम्ही जातिवादी नव्हतो, आता कसे झालो, एक गरिबांचा पंतप्रधान मोदी झाल्याने सोनिया गांधी, राहुल गांधींना झोप येत नसल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पैठणमध्ये बोलताना व्यक्त केली.
मोदी सरकारच्या नऊ वर्षे पूर्तीनिमित्त भाजप पैठणच्या वतीने, केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, डॉ. सुनील शिंदे, रेखाताई कुलकर्णी, लक्ष्मण ओटे, कल्याण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप महा-जनसंपर्क अभियानाअंतर्गत लाभार्थी संंमेलनात दानवे बोलत होते.
दानवे म्हणाले की, इंदिरा गांधी ११ वर्षे पंतप्रधान होत्या. त्यांनीही कोणतेही काम केले नाही. महिलांसाठी काय केले गांधींनी, मात्र पंतप्रधान मोदी होताच त्यांनी ९ कोटी लोकांना गॅस दिले, आता मोदींना पाडण्यासाठी पाटणामध्ये सर्व विरोधक एकत्र गेले. तेथे लालूप्रसाद यादव बोलले की, राहुल गांधींनी लग्न करावे, राहुल गांधींच्या लग्नाच्या बोलणीसाठी हे एकत्र आले का, अशी टीका दानवे यांनी केली.
माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले की, शहरात भाजपच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली, यापुढे देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रावसाहेब दानवे यांनी तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. सुनील शिंदे, विजय औताडे यांची भाषणे झाली. योगेश सोलाटे, भाऊसाहेब काळे, महेश जोशी, विजय चाटुपळे, शेखर पाटील, संकेत सूर्यनारायण, कांताराव औटे, हरिपंडित नवथर, विशाल पोहेकर यांची उपस्थिती होती.