
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयाला इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही पाठिंबा दर्शवीत अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भरघोस निधी येणार आणि इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.असे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमी वरती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी दुपारी १ वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागीय कार्यालय इंदापूर या ठिकाणी करण्यात आले आहे. असे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.
ही महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी या तातडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले आहे…