शहरातील ठिकठिकाणी शेकडो ब्रास वाळूचे साठे….
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा.दवणे जालना..
मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करून ठिकठिकाणी साठे करण्याचे काम वाळू माफिया करीत असून तहसीलदार रूपा चित्रक यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील उस्वद, देवठाणा, दुधा, टाकळखोपा, सासखेडा, कानडी, वाघाळा, वझर सरकटे यासह नदी पात्र असलेल्या अनेक गावातून दररोज वाळू चोरी होत आहे. सुरुवातीला तहसीलदार रूपा चित्रक यांनी वाळू माफियांवर दबंग कारवाई केली. मात्र काही दिवसातच चित्र बदलले असून शंभरातून एखाद्या गाडीवर कारवाई करायची हे सूत्र त्यांनी अवलंबले आहे. रविवारच्या मध्यरात्री देवगाव खवणे टोल नाक्याजवळ दस्तूरखुद्द तहसीलदार रूपा चित्रक यांनी अवैध वाळूचा टिप्पर पकडला मात्र तडजोडी अंती सोडून दिल्याची चर्चा आहे. अवैध उत्खनन बंद तर वाळू वाहतूक व साठेबाजी कशी ? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. तत्कालीन तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी वेळोवेळी वाळू माफियांवर कारवाई करून एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येते. यापूर्वी एक जेसीबी वाळू उत्खनन करताना पथकाने पकडला परंतु, जेसीबीत बिघाड झाल्याचे कारण दर्शवून जेसीबीच्या चालक व मालकास क्लीन चीट देण्यात आली. या जेसीबीचे पुढे काय झाले ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ असे प्रकार होऊन सुद्धा पोलीस गप्प आहेत हे आश्चर्यजनक आहे. तालुक्यात ठिकठिकाणी वाळूचे बेकायदेशीर साठे तर आहेतच शिवाय मंठा शहरातही तुकाराम महाराज परिसरासह इतर वेगवेगळ्या ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे साठे केल्याचे दिसून येते. उस्वद, दुधा, टाकळखोपा येथून स्थानिक टेम्पो धारकांकडून शेकडो ब्रास वाळूची चोरी होत असताना ही वाळू चोरी होईपर्यंत मंडळाधिकारी, तलाठी नेमके दुर्लक्ष का करतात ? वाळू उत्खननाचे व साठ्याचे पंचनामे का होत नाहीत ? या प्रश्नाचे उत्तर महसूल विभागाकडे सुद्धा नाही. दरम्यानच्या काळात पूर्ण नदीपात्रातून वाघाळा गावातून अवैध्य वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा टेम्पो माजी सरपंचाने पकडून तळणी पोलिसांच्या ताब्यात दिला. वाळू चोरीची ही घटना भर दिवसा घडली, यावेळी वाळू माफियांकडून सरपंचावर हल्ल्याचा प्रयत्न झाला त्यांच्या मदतीला शेतातील दोन भाऊ धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. पूर्णा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळू चोरीचा धंदा हा वाळू माफियांसाठी व्यवसाय बनला आहे. अनेक वाळू माफियांवर चार – चार, पाच – पाच गुन्ह्याची नोंद मंठा पोलीस स्टेशनला असून त्यांच्यावर हद्दपा रीची कारवाई होत नाही. मंठा तालुक्यातील वाळू उत्खनन, चोरी, वाहतूक व साठे याविषयी स्वतः जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.