
१७ वाळू साठे : केवळ वाळू वाहतूक रॉयल्टीसाठी मोजले २२ लाख…
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे.. जालना, मंठा तालुक्यातील पुर्णा नदीकाढच्या १७ गावांतील अवैध जप्त वाळू साठ्याचा ( दि. २१ ) रोजी शुक्रवारी तहसील कार्यालयात लिलाव प्रक्रिया पार पडली . मात्र , जप्त वाळू साठ्यातील निम्याहुन अधिक वाळू लिलावापुर्वी चोरुन विक्री केल्यानंतरही पुन्हा वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी १७ लिलावधारकांनी लिलाव घेऊन २२ लाख मोजल्याने वाळू वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूर्णा नदीपात्राशेजारी उस्वद , सासखेडा , लिबंखेडा , टाकळखोपा , किर्ला, वाघाळा , कानडी , दुधा , जांभरुण , हनवतखेडा , खोरवड, आनंदवाडी, देवठाणा , पोखरी केंधळे, वझर सरकटे या गावांतील अंदाजे सुमारे २ हजार ५०० ब्रास अवैध वाळू साठ्याची लिलाव प्रकिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत स्थानिकांनी सहभाग घेतला . मात्र , ज्यांनी वाळुचा साठा केला. त्यांनीच किंवा गांवातील वाळुचोरांनी एकत्रितपणे येत एकाच्या नावे लिलाव घेतल्याची बाब समोर आली . या लिलावातुन अंदाजे २२ लाखांचा महसूल तहसील प्रशासनाला मिळणार असलातरी वाळू चोरीच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे .
ही गावे बनली वाळु चोरीची केंद्र …
पुर्णा नदी काढच्या सासखेडा , दुधा , किर्ला व टाकळखोपा , लिबंखेडा , हनवतखेडा , उस्वद , देवठाणा व कानडी ही गावे वाळू चोरीची केंद्र बनली असून या गावांत रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीच्या तक्रारीनंतरही अपेक्षित कारवाई होत नाही . या गंभीर प्रकाराकडे नुतन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण नाथ बी. पांचाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी विशेष लक्ष देऊन ठोस कारवाई करावी , अशी मागणी होत आहे.
लिलावाच्या नावाखाली चोरीच्या गोरखधंदा …
मंठा महसूलच्या अधिका-यांसह तळणी मंडळ अधिकारी व संबंधित गावांच्या तलाठ्यांशी संगणमत करून वाळू चोर नदीपात्रातून गावातील सार्वजनिक ठिकाणी साठा करतात. मग , त्याचं वाळूसाठ्यांवर महसूलकडुन जप्तीची कारवाई होते. प्रत्यक्षात हजारो ब्रास असलेला साठा शेकडो ब्रास दाखवून लिलावाचा घाट रचला जातो. ज्यांनी वाळू चोरुन साठा केला. त्यांनाच लिलाव व्दारे देऊन वाळू चोरीचा गोरखधंदा राजरोसपणे चालविला जात आहे .
मंठा महसूल व पोलीसांचे ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष ?
मंठा महसूलने जुनमध्ये अवैध वाळू साठे जप्तीची कारवाई केली होती. १५ जुलैपर्यंत निम्यावर जप्तीचा वाळू साठ्यातील वाळू चोरी झाल्याची बाब समोर आली. महसूलने पितळ उघडे पडू नये म्हणून त्याचं जागेवर दुसऱ्यांदा वाळू साठा करणाऱ्याकडे किंवा करण्याच्या उद्देशाने लिलाव घेणाऱ्याकडे जाणिवपूर्वक महसूल व पोलीसांचे ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष केले ? अशी चर्चा रंगत आहे .
फोटो : पहिल्या फोटोत दुधा – जांभरुण पांदण रस्त्यांवरील वाळू साठा जप्तीची ९ जुलै रोजी कारवाई करताना पथक तर दुसऱ्या फोटोत त्याचं जागेवरील वाळूसाठा चोरुन विक्री केल्याचे २२ जुलै रोजी उघडकीस आले . पुर्णा काठच्या गावांत हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.
*फोटो : पुर्णा नदीपात्रातून किर्ला – दुधा- टाकळखोपा व सासखेडा या गावच्या हद्दीतुन दिवसाढवळ्या वाळू उत्खनन करुन वाहतूक करतांना ट्रॅक्टर दिसत आहे…