वाळू चोरी थांबेना : महसूलचे पथक रस्त्यांवर अन् नदीपात्रातुन ट्रॅक्टरने बेसुमार उत्खनन !
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे जालना…
मंठा तालुक्यातील टाकळखोपा व सासखेडा येथुन दिवसाढवळ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळूचोरी सुरू आहे . एकीकडे मंठा महसूलचे पथक दिंडी महामार्गावर वाहनांची तपासणी करत असतांनाच दुसरीकडे ट्रॅक्टरने नदीपात्रातुन बेसुमार वाळूचोरीचा ( ता. २८ ) शुक्रवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला .
टाकळखोपा व सासखेडा येथून मागील दोन महिन्यांपासून थेट पूर्णा नदीपात्रातून तब्बल १५ ट्रॅक्टरच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उत्खनन करून गावांतील सार्वजनिक ठिकाणी वाळूसाठा करायचा अन् त्याचं वाळू साठ्यांवरुन दिवसा विक्री करण्याचे काम बिनबोभाट सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लिलावाच्या नावाखाली हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नाही .
गावांतील अंतर्गत व मुख्य रस्त्यांची दुरावस्था …
वाळू वाहतुकीमुळे टाकळखोपा गावांतील अंर्तगत व मुख्य रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून चालणे सुद्धा अवघड झाले. अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनामुळे गावकरी त्रस्त झाले आहे. त्यातच वाघाळा- टाकलखोपा इंचा पूर्णा पाटी या ६ किमी रस्त्यांची सुद्धा प्रचंड दुरवस्था झाली आहे.
याबाबत मंठा नायब तहसीलदार एस यु शिंदे यांना पञकारांनी विचारले असता , टाकळखोपा व सासखेडा येथून ट्रॅक्टरने वाळू उपसा प्रकरणी संबंधित तलाठ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत तलाठी नितीन चिंचोले यांना पञकारांनी विचारले असता , टाकळखोपा येथुन वाळू चोरीची प्रत्यक्षांत पाहणी करुन अवैध वाळू चोरीचा पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर असल्याचे सांगितले…