
राख्या व पत्र पाठवून दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा..!
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- त्याग आणि समर्पण यातून देशाप्रती सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूर वीर जवानांना कर्तव्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या राखीची उणीव भासू नये यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत उस्माननगर येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी भगिनींनी राखीसह थेट सीमेवरील जवानांना लिखित पत्राच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या शब्दशुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या विविध भागांतील सीमेवर देशरक्षणासाठी जवान आपल्या प्राणाची तमा न बाळगता दिवसरात्र आपल्या डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावतात.अनेक सण उत्सव कुटुंबापासून दूर राहून सीमेवरच पहारा देतात त्यामुळे सद्भावनेच प्रतीक असणाऱ्या बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा धागा असणारी राखी त्यांना रक्षाबांधनाच्या निमित्ताने चिमुकल्या बहिनीकडून उपलब्ध व्हावी यासाठी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयातील तब्बल ५० विद्यार्थी भगिनींकडून राख्यासह पत्र संदेश पाठवण्यात आला आहे.यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यालयातील सहशिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.