
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-शिक्षण व्यवस्थेचा खरा पाया हा शिक्षक असून त्याच्या समस्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शिक्षक बंधू-भगिनी मध्ये नैराश्य वाढत आहे. लोकशाही मार्गाने प्रयत्न करून देखील नांदेड जिल्हातील व काही तालुक्यातील प्रशासन हे शिक्षक प्रश्नी केवळ चालढकलपणा व वेळकाढू भूमिका घेत आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यात पुढाकार घेणाऱ्या संघटना आणि व्यक्तीचा आवाज दाबात असून यावर सर्व संघटनानी वेळीच एकत्र येऊन लढा देण्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत. सोबतच जिल्हातील सीमावर्ती भागातील प्रशासन व दुर्गम भागातील शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवण्याऐवजी तेथील प्रशासन त्याची एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहे. जिल्हातील बिलोली, देगलूर, किनवट, माहूर, धर्माबाद, मुखेड, हिमायतनगर, भोकर हे तालुके भ्रष्टाचाराचे अड्डे बनत आहेत.सोबतच शिक्षक बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक चालू आहे. यात प्रामुख्याने आस्थापना विभाग, कर्मचारी, अधिकारी यांचा देखील समावेश आहे.काही शिक्षकांची अलिखित बदली, आस्थपना विभागात झालेली नेमणूक कारणीभूत आहे.
मेडिकल बिल, सातव्या वेतन आयोगाचे थकीत हफ्ते, अर्जित रजा, एकस्तर, चटोपाध्याय मंजूर करणे यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी घडत आहेत. अगोदरच शिक्षक बांधवांना वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम, चाचण्या, अशैक्षणिक कामे, सर्वेक्षण, बि.एल.ओ.यामुळे मेटाकुटीला आला आहे. शिक्षक बांधवांना मूळ कामाऐवजी इतर गोष्टीमध्ये गुंतवण्यात पुढाकार दिसून येत आहे गुणवत्तेमध्ये तर महाराष्ट्र २ क्रमांक वरून ७ व्या क्रमांकवर घसरला आहे. त्यात शिक्षकाचे खच्चीकरण व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात चालू आहे. यावर विविध संघटना आणि शिक्षक बांधव यांच्यातून नाराजीचे सूर निघतआहेत.
नांदेड जिल्हातील नवीन अधिकारी आणि प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.