
वडापुरी चे पशुधन पर्यवेक्षक डॉ. तेजस हांगे यांचे आवाहन…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे(इंदापूर):शेतकरी मित्रांनो मागील वर्षी संपूर्ण देशात थैमान घातलेल्या आणि ८० हजाराहून अधिक गायींचा मृत्यू झालेल्या लंपी या आजाराने आता पुन्हा एकदा डोक वर काढल्याचे दिसत आहे आज लंपी या आजारावर उपचार,लक्षणे आणि उपाय या सर्व बाबींची माहिती वडापुरी चे पशुधन पर्यवेक्षक डॉ.तेजस हांगे यांनी दिली आहे.
लंपी व्हायरस काय आहे ? सविस्तर माहिती..
मित्रांनो संपूर्ण देशभरात आपण मागील वर्षी लंपी या आजाराने थैमान घातल्याचे आपण पाहिले आहे. देशातील राजस्थान,पंजाब,मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यात आधी आलेल्या या आजाराने नंतर महाराष्ट्रात देखील प्रवेश केला आणि राज्यात देखील या आजारामुळे अनेक गायींचा आणि म्हशींचा मृत्यू झाला.या आजारावर अजूनही ठोस असा उपचार नसल्याने अनेक जनावरांचा या आजाराने मृत्यू झाल्याचे आपण पाहिले होते.आधी ताप येऊन नंतर जनावरांना मोठ्या प्रमाणात गाठी येऊन परिणामी १०-१२ दिवसांत जनावरांचा मृत्यू होत असतो.
लंपी हा आजार झाल्याने जनावरे हे दुध देण्यास कमी होतात.देशातील तब्बल १५ राज्यांत या आजाराने शिरकाव केला आहे.हा आजार आता पुन्हा एकदा डोक वर काढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पुन्हा एकदा लंपी हा आजार आल्याचे आपण पाहत आहे.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि परिणामी संपूर्ण गोठेच शेतकऱ्यांचे या आजाराने संक्रमित होतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
लंपी आजार लक्षणे काय आहेत..?
लंपी हा आजार सुरुवातीला साधारणच वाटतो त्यामुळे हा आजार लवकर लक्षात येत नाही आणि परिणामी हा आजार संपूर्ण शरीरात भिडल्यानेच याने जनावरांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात आले आहे.लंपी या आजारात सर्वात प्रथम जनावरांना ताप येण्यास सुरुवात होते आणि नंतर जनावरे खायला देखील कमी करतात खाणे कमी झाल्यानंतर जनावरांचे वजन कमी होण्यास सुरुवात होते.खायला आणि पेयला कमी झाल्यामुळे जनावरांची तब्येत खराब होण्यास सुरुवात होते.जनावरांच्या तोंडातून लाळ गळण्यास सुरुवात होते त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना लाळ येणे हाच आजार झाला असल्याचे भासते परंतु लाळ गळणे हेदेखील लंपी या आजाराचे एक लक्षण आहे.जनावरांच्या डोळ्यातून देखील सतत चिकट पाणी येत असते आणि यामुळे जनावरांची तब्येत खालावते लंपी झालेले जनावर जर दुभते असेल तर ते जनावर दुध देण्यास देखील खूप कमी होते.
*लंपी या आजारासाठी घ्यावयाची काळजी –*
लंपी हा आजार संसर्गजन्य आणि अतिशय वेगाने पसरणारा आजार असल्याने सर्वात महत्वाचे म्हणजे हा आजार तुमच्या जनावरांपर्यंत पोहोचू नये यासाठीच शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.लंपी आजार होऊ नये यासाठी गोठ्यामध्ये जास्त गोचीड,माश्या,डास नसावे.गोठा हा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.गोठ्यामध्ये वेळोवेळी लिंबाचा पाला जाळून गोठ्यामध्ये धूर केल्यास सर्व डास,माश्या निघून जातात आणि त्यामुळे लंपी आजार होण्याची शक्यता कमी होते.कोणत्याही जनावरास लंपी आजाराची लक्षणे जाणवल्यास किंवा लंपीची लागण झाल्यास लगेच अशा जनावरांना इतर जनावरे आणि गोठ्यापासून दूर ठेवावे.लागण झालेल्या जनावराचे खाणे देखील वेगळे ठेवणे गरजेचे आहे.
लंपी या आजारावर अजूनही ठोस असा कोणताही उपचार नसल्याचे डॉक्टर कडून सांगण्यात येत असले तरी यासाठी आता जनावरांना लस देऊन लंपी हा आजार काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो.डाॅ.राम शिंदे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडापुरी कार्यक्षेत्रातील संपूर्ण लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुधन पर्यवेक्षक डॉ.तेजस हांगे यांनी दिली. तरी अद्याप ज्या जनावरांचे लसीकरण बाकी आहे त्या पशुपालकांनी त्वरित आपल्या जवळील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली पाहिजे असे डॉ.तेजस हांगे यांनी म्हटले आहे.