
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर): राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना देखील जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर तेथील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमानुष लाठी चार्ज केला गेला. याविरोधात सखल मराठा समाज देगलूर तर्फे ४ सप्टेंबर २०२३ रोज सोमवार रोजी देगलूर बंदची हाक दिली आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुण, महिला, वृद्ध, लहान मुले असे हजारोंच्या संख्येने अंतरावली सराटी या गावी मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले असताना आज दि. १ सप्टेंबर रोजी अचानक पोलिसांचा मोठा ताफा तिथे पूर्ण तयारीने आला आणि त्यांनी अचानक हल्ला चढविला.
त्यांच्या या अमानुष हल्यामध्ये महिला, तरुणांची डोके फुटली घराघरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली. अश्रृ धुराचे नळकांडे सोडण्यात आले. आंदोलन दडपण्याचे प्रयत्नात शांततेत चालू असणारे हे आंदोलन अचानक पेटले. जे नको होते तेच झाले. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध होत आहे. मराठा समाज सरकारवर नाराज असून महासंघाने जालना चे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे.५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले. पण या लाठीचार्जमुळें शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. देगलूर येथे दि. २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने तातडीची बैठक बोलावून दि.४ सप्टेंबर २०२३ रोज सोमवार रोजी सखल मराठा समाज तर्फे देगलूर बंदची हाक देण्यात येणार असून या बंदला सर्व छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी १००टक्के प्रतिसाद द्यावा अशी सकल मराठा समाजातर्फे आव्हान करण्यात आले आहे .या हल्ल्याचा सकल मराठा समाज देगलूर तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी व पोलीस स्टेशन देगलूर येथे निवेदना मार्फत दिला आहे. त्यावेळी देगलूर शहरातील व तालुक्यातील सर्व मराठा बांधव उपस्थित होते.