
भावी पीढीसाठी शिक्षकांचे योगदान सर्वश्रेष्ठ…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
(पुणे) वाघोली : शिक्षणाचे नवे जग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि जागतीकीकरणाचे संदर्भ समजावून घेत पुढे जाण्याचा संकल्प करुया. तमाम शिक्षक बांधव – भगिनिंना आजच्या शिक्षकदिनी मनःपूर्वक शुभेच्छा…
शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उचलून धरताना इमारती, खोल्या, वर्ग यांत शिक्षण कोंबून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नव्या डिजीटल माध्यमांचा व आंतरराष्ट्रीय संकल्पनांचा विचार करून विद्यार्थी जगताच्या इच्छा -आकांक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
शिक्षणतत्वाचे आचरण काय सांगते?
विद्यालयांत प्रविष्ट होताना संबधित विद्यालया बाबत संशोधन, अध्यापन पद्धती, सहशालेय उपक्रम, शाळेचा दर्जा, इतिहास आणि शिक्षण तपस्वी अध्यापक यांची ओढ असायला हवी. कार्पोरेट इमारती, क्लासेसच्या जाहीराती यांची भुरळ न पडता शिक्षण तत्व, राष्ट्र प्रेम, राष्ट्र निष्ठा, चारित्र्य आणि नागरिकत्वाचे संवर्धन याबाबत पालक -विद्यार्थी चौकस असणे गरजेचे आहे. लाखो रुपये देउन प्रवेश मिळविणे यापेक्षा प्राध्यापक, अध्यापक यांच्या ओढीनं प्रवेश घेणं हे शिक्षण तत्वाचे खरे आचरण होय.
शिक्षणातील स्थित्यंतरे….
सन१९९२पासून जागतिकीकरण आणि उदारीकरणाला सुरुवात झाली. शिक्षणांतील राष्ट्रीय उद्दीष्टे, धोरणे ज्या मूल्यांसाठी समोर शिक्षणांमुळे विद्यार्थी आणि समाज घडला पाहीजे ही भूमिका स्पष्ट झाली त्याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. व्यवसायाभिमुख, कौशल्य सेतू अभ्यासक्रम असतानांही केवळ नोकरीसाठी शिक्षण या भूमिकेला चिकटून मंडळी वेगळया दिशेने प्रवास करत आहेत.
केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा मोहिम, शिक्षण हक्क कायदा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान, नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान, संच मान्यता, आधारकार्ड नियमितता, बायोमेट्रीक प्रणाली, शालेय पोषण आहार या आणि अशा अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु झाली. योजनांमुळे आपण पुढे जात असलो तरी विद्यार्थ्यांची मुलभूत कौशल्ये मात्र वाढतांना दिसत नाहीत. कोणताच वर्ग लेखन, वाचन, श्रवण, संभाषण कौशल्यांत१०० टक्के साक्षर दिसत नाही, हे शिक्षण व्यवस्थेतील मोठे आव्हान उत्तरदायित्व म्हणून आम्हांस स्विकारावे लागेल.
भारतीय शिक्षणातील वास्तव चित्र…
शिक्षणाने नागरिकत्वाचे संवर्धन व्हावे, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच विद्यार्थी स्वावलंबी बनावा ही शिक्षण भूमिकेची खरी गरज आहे. शिक्षणाने व्यक्तीच्या जीवनांत सुसंवाद, सामर्थ्य, सर्जनशीलता, नव विचारप्रवाहांचे दालन खुले व्हावे आणि उपयोजनात्मक विचारधारा अंगभूत व्हावी यासाठी राज्य आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मांडला गेला आहे.
आजही वास्तव असे आहे, १लीत ५० मुले दाखल झाली तर केवळ १९ टक्केच विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. प्रगत देशात हे प्रमाण ५० टक्के आहे. आपणांस स्थगन आणि गळती या प्रकारांना बाजूला सारत हे प्रमाण 2030पर्यंत 30 टक्क्यांपर्यंत न्यावे लागेल.
प्रादेशिक असमतोल, प्रति विद्यार्थी खर्चाचे अत्यल्प प्रमाण, असमाधानकारक अध्ययन_ अध्यापन प्रक्रिया, व्यवस्थापनातील दबाव, गैरव्यवहार या बाबींमुळेही शिक्षणाला जागतिक उंचीवर नेण्यास आपण असमर्थ ठरत आहोत. भारत सरकारने शिक्षणासाठी घरेलू उत्पादनाच्या किमान १५ टक्के शिक्षणावर खर्च करणे अत्यंतिक गरजेचे आहे.