
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी .
नांदेड देगलूर:-मराठा आरक्षण आंदोलनामुळे ३ व ४ सप्टेंबर रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार बसगाड्या आगारातून बाहेर काढण्यात आल्या नाहीत; परंतु संबंधित दिवसाची उपस्थिती लावण्यासाठी देगलूर आगारातील प्रभारी आगार प्रमुखाने उपस्थिती लावण्यासाठी कांही वाहक व चालकांना चक्क गाड्यांचे साफसफाई करण्यास सांगून अधिकाराचा गैरवापर केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावर करण्यात आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी आंदोलन करणारांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.त्याचीच प्रतिक्रिया म्हणून राज्याच्या विविध भागात अनेक ठिकाणी टायर जाळणे, प्रतिमा जाळणे, गाड्यांना आग लावणे असे अनेक प्रकार घडले. मराठा आंदोलकांच्या रोषामुळे परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३ व ४ सप्टेंबर रोजी बसगाड्या आगारातून बाहेर काढण्यात येऊ नयेत. अशा प्रकारचे आदेश दिले. त्यानुसार देगलूर बस आगारातून दि.३ व ४ सप्टेंबर रोजी एकही बसगाडी प्रवासासाठी बाहेर निघाली नाही. दिनांक ३ सप्टेंबर रोजी सर्व कर्मचाऱ्यांना देगलूर आगारात दिवसभर उपस्थित राहण्यास सांगून त्यांची उपस्थिती टाकण्यात आली. तर दि.४ सप्टेंबर रोजी आगार प्रमुख अमर पाटील रजेवर असताना प्रभारी आगार प्रमुख यमलवाड यांनी आगारातील बसचालक आर.डी.इबीतदार, बी.एच.कांबळे, एस.व्ही.बसापुरे,एस.आर.देशमुख,बी.एम.झुंजारे, एस. एस.हिवराळे, बसवाहक डी.एस.वाघमारे, जी.डी. सूर्यवंशी, एस.एम. मुखेडकर, जी.एस.संगेवार, एस..एस.बाचावार आदी वाहक-चालक कर्मचाऱ्यांना देगलूर आगारात गाड्यांची साफसफाई करण्यासाठी दोन महिला कर्मचारी आणि एक हेल्पर असताना जाणीवपूर्वक गाड्यांची साफसफाई करण्यास लावली. गाड्यांची साफसफाई केली तरच उपस्थिती लावण्यात येईल अन्यथा उपस्थिती लावण्यात येणार नाही.अशा प्रकारचा धाक घालून वाहक-चालकांकडून गाड्या सफाईचे काम करून घेतले. रजा आणि सुट्टीवर असलेले कर्मचारी वगळता सर्वसामान्यपणे दररोज ८० वाहक आणि ८० चालक ड्युटीवर असतात. एवढे कर्मचारीवर ड्युटीवर असताना केवळ १४-१५ चालक- वाहक कर्मचाऱ्यांकडून गाड्यांची साफसफाई करून घेण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी दि.२३ जानेवारी २०१४ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या आदेशांचे येथील प्रभारी अधिकाऱ्याने अवमूल्यन केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कडक कारवाई करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
देगलूर बस आगारात वाहक आणि चालकांकडून गाड्या धुवून घेतल्या असल्याचे समजताच दैनिक देशोन्नतीच्या स्थानिक प्रतिनिधीने देगलूर आगारास भेट देऊन आगाराच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी आलेले डीसी कुलकर्णी साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला असता त्यांनी व डीटीओ कमलेश भारती साहेबांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेऊन योग्य ती कारवाही करण्याचे आश्वासन दिले.