
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर) ;खड्ड्यांचा शहर म्हणून देगलूर शहराची महाराष्ट्रभर ओळख झालेली असून शहरातील अनेक भागांमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सव दुर्गा देवी उत्सव यांच्या शहरातील विविध रस्त्यावर शोभायात्रा निघत असते त्यात शहरातील पडलेले खड्ड्यांमुळे शोभायात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी देगलूर शहरातील जनतेत चर्चा होत असताना दिसत आहे. देगलूर शहराच्या विकासाची मोठमोठी स्वप्ने दाखवित स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार करण्यात सर्वपक्षीय नेते गुंतलेले असतांना प्रत्यक्षात शहरातील बहुतांश रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाळ्यानंतर होणारी कामे यावर्षी झाली नसल्याने पावसाने पडलेले खड्डे कायम आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी आता देगलूरकरांना नव्या नगरसेवकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यासोबतच वाहनांचे नुकसान आणि वाहनचालकांना पाठदुखीचा त्रासही होऊ लागला आहे.सध्या देगलूर शहरात ड्रेनेज मुळे रस्त्यावर खड्डे पडले असून काही रस्त्यावर ड्रेनेज मधील घाण पाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. देगलूर शहरात खडे नाहीत, असा रस्ता सापडणे अवघड, अशी स्थिती आहे. नव्याने झालेले रस्तेही याला अपवाद नाहीत. खड्डे चुकविण्यासाठी दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागते. खड्डे चुकविताना अनेकदा अपघातही होतात. त्यावरून होणारे वाद पोलिस ठाण्यापर्यंत जातात. पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती केली जाते. त्यानंतर नगरपालिका निवडणूक जाहीर न झाल्याने ही कामे राहून गेली. सध्या पदाधिकारी निवडणूक लढण्यासाठी ‘गुडघ्याला बाशिंग बांधून तयारआहेत, त्यामुळे आवश्यक ती दुरुस्तीही सध्या होऊ शकत नाही. हे रस्ते दुरुस्त होण्यासाठी आता निवडणूक होऊन नवीन पदाधिकाऱ्यांचीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. शहरातील रस्ते अंत्यत खराब झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना अशा रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. शहरातील काही भागात तर प्रशासन आहे की नाही? अशीच परिस्थिती आहे. येथील रस्त्यांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. आता नवीन पदाधिकारी तरी रस्त्याच्या कामांना प्राधान्य देतील, अशी अपेक्षा शहरातील नागरीक करीत आहेत.