
मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना इंडियन पँथर सेनेचे साकडे…
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/बिलोली :-बिलोली उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षित अधिकारी व तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान असणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची निवड करण्याची मागणी इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व आरोग्य मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बिलोली उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, डॉक्टरां अभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावेत, असे दुगाने यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रस्तुत रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सातत्याने येत असतात. दररोज ॲडमिट रुग्णांची संख्या ५० च्या पुढे असते. सातत्याने गेली काही वर्षे डॉक्टरअभावी रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी रुग्ण सेवेवर या बाबीचा विपरीत परिणाम होत आहे. आज रुग्णालयात एकही प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे प्रसूतीसाठी महिलांना अशा स्थितीत नांदेड जिल्हा रुग्नालयात जाण्याचा सल्ला अनिवार्यपणे देण्यात येतो. कित्येकदा रस्त्यातच प्रसूतीच्या अनेक प्रसंग यापूर्वी घडले आहेत. सर्व तांत्रिक उपलब्धता असून तज्ञ कर्मचारी नसल्याने ती मशनरी तशीच धुळखात पडून आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे. रुग्णांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवला पाहिजे. या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर या रुग्णालयात तातडीने रुजू व्हावेत म्हणून योग्य निर्देश संबंधित विभागाला देऊन अतितत्पर पद्धतीने डॉक्टर बिलोली जिल्हा उप रुग्णालयात उपलब्ध करून तज्ञ तांत्रिक कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन देण्यात यावी. अशी मागणी बिलोली तालुक्यासह जिल्ह्यात सामाजिक प्रश्नावर संवेदनशील असणाऱ्या इंडियन पँथर सेना या सामाजिक संघटनेकडून करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. या मागणीच्या अनुषंगाने तज्ञ कर्मचाऱ्यांची आरोग्य विभाग कधीपर्यंत निवड करुन दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणार याकडे बिलोली व परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.