
दै. चालु वार्ता प्रतिनिधी:भारत पा.सोनवणे
*छत्रपती संभाजीनगर-* पोलिस भरती २०२२-२३ ला सन्वारुत झाली असून बुधवारपासून (१९ जून) मैदानी चाचणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात शहर पोलिस शिपाई २१२, कारागृह शिपाई ३१५, ग्रामीण पोलिस शिपाई १२६, ग्रामीण चालक शिपाई २१ आणि रेल्वे पोलिस शिपाई ८०, अशा ७५४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप पाटील, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया आणि पोलिस अधीक्षक (रेल्वे) स्वाती भोर यांनी दिली.
ऐनपावसाळ्यात मैदानी चाचणी सुरू होत आहे. जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढील तारीख व वेळ दिला जाईल. त्यामुळे कोणीही भरतीपासून वंचित राहणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, रात्री शहरात येणाऱ्या उमेवारांची टीव्ही सेंटर जवळील कैलास शिल्प सभागृहात मुक्कामाची व्यवस्था केली जाईल, असे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले. ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी १९ ते २२ जून आणि ग्रामीण चालक शिपाई पदांसाठी २४ ते २६ जूनदरम्यान मैदानी चाचणी होणार आहे.
उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी
मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उमेदवार बदलाचे घोटाळे होतात. हे पाहता यंदा प्रथमच पात्र उमेदवारांची थम्बद्वारे बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीला आलेला उमेदवारच लेखी परीक्षेला आला का? हे यातून तपासले जाईल. याशिवाय, मैदानी चाचणीच्या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्ही राहणार आहेत. हॅन्डी कॅमेऱ्याद्वारेही चित्रीकरण केले जाणार आहेत.
पोलिस भरती अतिशय पारदर्शकपणे पार पडणार आहे. उमेदवारांनी कोणाच्याही आमिषाला बळी पडू नये. मैदानी चाचणी सुरू असताना मैदानापासून १०० मीटर अंतरापर्यंत भरती संबंधी काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांशिवाय कोणीही थांबू नये. या भागात कलम १४४ (३) लागू आहे. कोणालाही काही शंका वाटली तर उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्याशी संपर्क साधावा.
-संदीप पाटील, पोलिस आयुक्त.