
अन्यथा लोहा शहर बेमुदत बंद करुन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
लोहा /प्रतिनिधी
गोविंद पवार
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांना राजकीय द्वेवषापायी उपविभागीय अधिकारी कंधार सौ. अरुणा संगेवार यांनी दिलेली हदपारीची नोटीस तात्काळ रद्द करावी अन्यथा लोहा शहर बेमुदत कडकडीत बंद करुन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांनी लोहा येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भरगच्च पत्रकार परिषदेत दिला आहे.
पुढे बोलताना शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार म्हणाले की, लोहा -कंधार तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचे काम चालू आहे.
लोहा -कंधार तालुक्यातील पोलीस स्टेशन, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय हे नांदेडच्या माजी भाजपाच्या खासदारांच्या दबावाखाली काम करीत आहे त्यांच्या सत्तेचा माज लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने उतरविला आहे.
त्याचप्रमाणे लोहा -कंधार मधील अधिकाऱ्यांचा माज जनता आगामी काळात उतरवेल.
चंद्रकांत पाटील क्षीरसागर हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत त्यांच्यावर कारवाई केल्यास इतर लोक हे दबतील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार नाहीत हा जो महसूल व पोलीस प्रशासनाचा गैरसमज आहे हे कदापि खरा ठरणार नाही.
लोहा व कंधार तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात व कंधारच्या उपविभागीय अधिकारी यांनी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांना दिलेल्या हदपारीच्या नोटीसा विरोधात शिवसेनेचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटून राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आवाज उठविला जाईल .
प्रशासकीय अधिकारी हे कुण्या पक्षाचे नसतात लोकांची सेवा करण्याची ते लोकसेवा आयोगा मार्फत निवडले जातात व ते लोकसेवक असतात त्यांनी निःपक्षपातीपणाने काम केले पाहिजे
परंतु लोहा -कंधार येथील प्रशासन हे भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे . उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असे वागु नये . लोहा -कंधार मधील अवैध धंदे बंद करावेत .
शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांनी अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असताना त्यांना प्रशासनाने भाजपा नेत्यांचे ऐकून जाणून बुजून दिलेली हदपारीची नोटीस तात्काळ रद्द करावी अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडून लोहा बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा शिवसेना उबाठा चे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख खंडू पाटील पवार, बालाजी पाटील पवार प्रकाश चव्हाण,,रुद्रा पाटील भोस्कर, तुळशीराम लुंगारे,अमर टेलर, यांच्यासहित मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत लोहा -कंधार ची जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करेल .
लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता येथील निवडणूक ही जनतेनी हातात घेतली असून शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा उमेदवार मी असुन हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा पक्षाकडे असेल व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला येथील उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे.
येथील विद्यमान शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे महाविकास आघाडीत नाहीत. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागण्याचा अधिकार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी नांदेड व लातूर मतदार संघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही. पंजा ला मत मागितले नाही त्यांनी एक शब्द ही काढला नाही.
नांदेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले असता त्यांच्या स्वागताला हे गेले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी मतदानाच्या वेळेस पळत जाऊन भाजपाला मदत केली आहे.
त्यामुळे त्यांचा हक्क या मतदार संघावर महाविकास आघाडीच्या वतीने राहणार नाही व हा मतदारसंघ संघ हा शिवसेनेचा आहे व मी शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार असुन जनता मला विजयी करेल असे एकनाथ दादा पवार म्हणाले.