
दै. चालु वार्ता,प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी: ” ग्रामीण भागातील आई-बाप शेतात दिवस-रात्र काम करुन तुमच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. विद्यार्थ्यांनो, याची गांभीर्याने जाणीव ठेवून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करुन स्वतःसह आई-वडीलांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवा ”, असे मौलिक मार्गदर्शन शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी केले. मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य एस. व्ही. कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, स्कूल कमिटी सदस्य भारत पाटील-पेरीडकर, प्रा. ए. व्ही. पवार, प्रा. शिवाप्पा पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होते. पुढे बोलताना श्री. घेरडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नको तिथे मन लावण्यापेक्षा अभ्यासात मन लावावे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने आणि चिकाटीने अभ्यास करुन अफाट मेहनत करावी आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षक आणि कायद्याचे रक्षक तुमच्यात सुधारणा व्हावी यासाठी शिक्षा करत असतात. शिक्षक आपल्या जीवनाला योग्य वळण लावतात. कायदा तुम्हाला संरक्षण देतो, असेही ते म्हणाले. सपोनि अभिजीत पाटील म्हणाले की, तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रोड-रोमिओंची पोलीस प्रशासनाने धरपकड सुरू केली असून अशा टवाळखोरांवर लगेचच पोलीस कारवाई होत असून मुलींना संपूर्ण अभय दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. प्रा. पूर्वा खोत यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. वाय. इंदापूरे, डी. बी. कोडोलकर यांनी परिश्रम घेतले.