
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर ): देगलूर बिलोली तालुक्यात निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटाना तोंड द्यावे लागते. एक वर्षी गोगलगायीने पिकाचे नुकसान तर गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे उत्पादनात घट झाली तर यावर्षी मागील तीन ते चार दिवसापासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून खरीप हंगामातील नगदी पिके असलेले सोयाबीन, तुर, उडीद ,कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी जून महिना उजाडण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी होता. म्रग नक्षत्र मध्ये पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद या बरोबरच तुर पिकाची पेरणी केली. सध्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिकातील आंतर मशागत होऊ शकली नाही किंवा पिकात तण वाढू नये यासाठी वापरण्यात येत असलेले तणनाशकही फवारता आले नाही. पिकात तनाणी जोर केल्याने पीक खाली व तण वर अशी परिस्थिती आहे. काही शेतकऱ्यांना रानातील पाणी बाहेर न गेल्याने पिकात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडलीआहेत. सोयाबीन हे सर्वात जास्त प्रमाणात घेणारे पीक असल्याने देगलूर बिलोली तालुक्यातील सर्व महसूल मंडळात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमानात केली जाते. या पावसाने सोयाबीनचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे झालेल्या शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.