
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
शिवसेना ठाकरे गटाने लोहा कंधार विधानसभेतून आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता लोहा-कंधार मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे.
महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटाने ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लोहा ८८ मतदार संघातून एकनाथदादा पवार यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण या निवडणुकीत दोन्ही पक्षांचं अस्तित्व हे पणाला लागलं आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर आता दोन्ही शिवसेना या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एकनाथ दादा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह याही ठिकाणी महाविकास आघाडी साठी पोषक वातावरण आहे. या सर्व वातावरणाचा फायदा एकनाथ दादा पवार यांना निश्चितच होईल.
यंदा लोहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख २३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष १ लाख ५४ हजार ३६५, स्त्री १ लाख ४५ हजार ८६५, तर तृतीय पंथी ५ मतदारांचा समावेश आहे. यंदा महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या ८ हजार ५०० इतकी अधिक आहे.
सूर्योदय मन्याड फाऊंडेशनचे अध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढविण्याचा नव्हे तर जिंकण्याचा संकल्प केला असून सतत गत चार वर्षांपासून लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावातील, वाडी- तांड्यातील मतदार, जनता, युवक,वयोवृद्ध, तसेच विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. लोहा-कंधार विधानसभेची निवडणूक मला जनतेसाठी जिंकायची आहे, मतदार संघाच्या विकासासाठी ही निवडणूक मला जिंकायची असून लोहा कंधार मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटणारच .