
पुणे:विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा अंदाज आरएसएसच्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. आरएसएसकडून महाराष्ट्रातील 288 जागांचं सर्वेक्षण करण्यात आलं. याबाबत आरएसएसच्या एका संबंधित व्यक्तीने सांगितले की, राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण समजून घेण्यासाठी संघ निवडणुकीपूर्वी गोपनीय पद्धतीने अंतर्गत सर्वेक्षण करतो. त्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजपची निवडणूक रणनीती बनवली जाते आणि लोकसंख्या लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. दरम्यान, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरएसएसने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे.
तर महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अंतर्गत सर्व्हे समोर आला असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला 160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात कोणाला किती जागा?
आरएसएसच्या सर्वेक्षणानुसार महायुती 160 जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये भाजपला 90 ते 95 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरएसएसचा या सर्वेक्षणाचा हा अंदाज खरा ठरतो की निवडणुकीच्या मैदानात नवे वळण येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदान; यंदा महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…